Arshdeep Singh vs Ruturaj Gaikwad : भारतीय संघातील स्टार बॉलर अर्शदीप सिंग इंग्लंड विरुद्धच्या मालिकेआधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला जलवा दाखवून देत आहे. बडोदाच्या कोटंबी स्टेडियमवर रंगलेल्या महाराष्ट्र विरुद्धच्या लढतीत अर्शदीप सिंगनं पंजाबच्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. महाराष्ट्र संघाचा कॅप्टन आणि स्टार बॅटर ऋतुराज गायकवाडला त्याने चकवा देत बोल्ड केले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या सिद्धेश वीर याला अर्शदीपनं खातेही उघडू दिलं नाही. महाराष्ट्र संघाचा डाव सावरत शतकी खेळी करणारा सलामीवीर अर्शीन कुलकर्णीची विकेटही अर्शदीपनंच टिपली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या ओव्हरमध्ये ऋतुराजचा खेळ केला खल्लास; वीरच्या पदरी पडला भोपळा
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील तिसरा क्वार्टर फायनल सामना महाराष्ट्र विरुद्ध पंजाब यांच्यात रंगला आहे. बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवरील सामन्यात पंजाबचा कर्णधार अभिषेख शर्मा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत अर्शदीपनं सुरुवातीला महाराष्ट्र संघाला धक्क्यावर धक्के दिले. महाराष्ट्र संघाच्या धावफलकावर अवघ्या ६ धावा असताना पहिल्याच षटकातील सहाव्या चेंडूवर अर्शदीपक सिंगनं महाराष्ट्राचा कर्णधार आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाडला बोल्ड केले. दुसऱ्या षटकात पुन्हा गोलंदाजीवर आल्यावर त्याने सिद्धेश वीरला तंबूचा रस्ता दाखवला. ऋतुराज गायकवाडनं ५ तर सिद्धेश वीरला खातेही उघडता आले नाही.
अखेरच्या षटकात अर्शदीपनं केली शतकवीर अर्शिन कुलकर्णीची शिकार महाराष्ट्र संघानं पहिल्या दोन विकेट्स गमावल्यावर सलामीवीर अर्शिन कुलकर्णी याने संघाचा डाव सावरणारी खेळी केली. त्याने १३७ चेंडूत १०७ धावा केल्या. अखेरच्या षटकात अर्शदीपनेच या शतकवीराला तंबूचा रस्ता दाखवला. अर्शिन कुलकर्णीशिवाय अंकित बावने ६०(८५) आणि निखिल नाइक ५२ (२९) यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्र संघानं निर्धारित ५० षटकात ६ बाद २७५ धावांपर्यंत मजल मारली.