Arshdeep Singh Took Fifer Against Mumbai In Vijay Hazare Trophy : भारतीय संघातील जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंंग याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 'पंजा' मारून मुंबई संघाला घायाल केल्याचे पाहायला मिळाले. अर्शदीप सिंगच्या भेदक माऱ्यामुळे मुंबईचा अर्धा संघ पॉवर प्लेमध्येच तंबूत परतला. पॉवर प्लेनंतर आणखी एक विकेट आपल्या खात्यात जमा करत पंजाबच्या ताफ्याकडून खेळणाऱ्या अर्शदीप सिंगनं पाच विकेट्सचा डाव साधला. यंदाच्या वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये टॉप क्लास कामगिरी करणाऱ्या या युवा गोलंदाजानं देशांतर्गत वनडे स्पर्धेतील क्लास कामगिरीसह पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या शर्यतीत आपली दावेदारी भक्कम केली आहे.
अर्शदीपसमोर सूर्यकुमारच्या पदरी भोपळा, श्रेयस अय्यरही नाही टिकला
अर्शदीप सिंगनं पहिल्याच षटकात मुंबईकर अंगकृष रघुवंशी याला पायचित करत आपल्या विकेट्सचे खाते उघडले. तिसऱ्या षटकात पुन्हा गोलंदाजीला आल्यावर त्याने मुंबईच्या संघातील स्टार बॅटर आयुष म्हात्रेला आपल्या जाळ्यात अडकवले. पहिल्या दोन षटकात ९ धावा खर्च करून त्याने दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. मुंबईचा संघाची बॅटिंग ऑर्डर मजबूत असल्यामुळे संघ यातून सावरेल, असे वाटत होते. पण अर्शदीपसमोर हा अंदाज फिका ठरला. पाचव्या षटकात सूर्यकुमार यादवच्या रुपात मोठा मासा अर्शदीप यादवच्या गळाला लागला. पाच चेंडूचा सामना करून सूर्यकुमार यादव खाते न उघडता तंबूत परतला. १७ चेंडूत दोन चौकार आणि एक षटकार मारणाऱ्या श्रेयस अय्यरचाही युवा गोलंदाजासमोर निभाव लागला नाही. अर्शदीपला त्याने क्लीन बोल्ड केले. पॉवर प्लेमध्ये त्याने मुंबई संघाचे कंबरडे मोडले. पॉवर प्लेच्या खेळानंतर शिवम दुबेला आपल्या जाळ्यात अडकवत अर्शदीप सिंगनं मुबंई संघाच्या उरल्या सुरल्या आशेलाही सुरुंग लावला.
६ बाद ६१ धावा या बिकट अवस्थेतून मुंबईनं पंजाबसमोर सेट केलं २४९ धावांचे टार्गेट
अर्शदीपच्या भेदक माऱ्यासमोर मुंबई संघाची अवस्था १३ षटकात ६ बाद ६१ धावा अशी झाली होती. सूर्यांश शेडगेनं ४३ चेंडूत केलेली ४४ धावांची खेळी आणि स्पिनर अथर्व अंकोलेकर याच्या ६६ धावांच्या खेळीसह शार्दुल ठाकुरनंही बॅटिंगमध्ये दम दाखवला. शार्दुलनं ४५ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. या तिघांच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघाने ४८.५ षटकात सर्वबाद २४८ धावांपर्यंत मजल मारली होती.
मुंबईसमोर पंजाबचा 'भांगडा', ८ गडी अन् २१ षटकं राखून जिंकला सामना
मुंबईनं सेट केलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना बॅटिंगमध्ये दुसरा सिंग किंग होऊन पुढे आला. प्रभसिमरन सिंगनं १०१ चेंडूत १४ चौकार आणि १० षटकार मारत १५० धावा ठोकत मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याच्याशिवाय अभिषेक शर्मानं ५४ चेंडूत ४ चौकारासह ५ षटकाराच्या मदतीने केलेल्या ६६ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाब संघाने मुंबई विरुद्धचा सामना ८ गडी आणि २१ षटके राखून खिशात घातला.