लाहोर : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानातून त्यावर टीका होत आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंनीही बीजेपीच्या या निर्णयावर टीका केली आहे. आता त्यात पाक क्रिकेट संघाचा कर्णधार सर्फराज अहमदचीही भर पडली आहे. एका स्थानिक चॅनेलला मुलाखत देताना सर्फराजनं कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर मत व्यक्त केले. पाकिस्तानी जनता काश्मीरींसोबत असल्याचे मत त्याने व्यक्त केले. यापूर्वी पाकचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीनेही या निर्णयावर टीका केली होती.
पाकिस्तानकडून आतापर्यंत 114 वन डे सामना खेळणारा सर्फराज म्हणाला,''या कठीण प्रसंगातून काश्मीरच्या लोकांची लवकरात लवकर सुटका होऊदे, अशी मी अल्लाहकडे दुवा मागतो. काश्मीरच्या जनतेच्या दुःखात आम्ही सहभागी आहोता. पाकिस्तानची संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी आहे.''
पाहा व्हिडीओ...
यापूर्वी आफ्रिदीनेही टीका केली होती. तो म्हणाला,''काश्मीरला संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाच्या आधारावर त्यांचे अधिकार द्यायला हवेत. सर्वांना स्वातंत्र्याचा अधिकार आहे. संयुक्त राष्ट्राची निर्मीती का केली गेली आहे आणि या प्रकरणात संयुक्त राष्ट्र झोपा काढत आहे का? काश्मीरात सातत्यानं मानवताविरोधी पावलं उचलली जात आहेत. त्याच्यावर लक्ष द्यायला हवे. डॉनल्ड ट्रम्प यांनीही या प्रकरणात मधस्थाची भूमिका पार पाडायला हवी.'' याआधीही आफ्रिदीनं काश्मीर मुद्यावर वादग्रस्त विधान केले आहे.