कोलकाता : वयाच्या ६६ व्या वर्षी भारताचे माजी सलामीवीर अरुण लाल हे दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. २८ वर्षांनी लहान असलेल्या बुलबुल साहासोबत त्यांनी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. या दोघांमध्ये बऱ्याच वर्षांपासून मैत्रीचे नाते होते. विशेष म्हणजे अरुण लाल यांच्या विवाहाच्या पत्रिका छापण्यात आल्या असून, त्यांचे वाटपही सुरू झाले आहे. २ मे रोजी कोलकाता येथील पीयरलेस इन हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडेल.
अरुण लाल यांनी पहिला विवाह रीना देवी यांच्याशी केला होता. आता त्यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेतलेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रीना खूप दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे त्यांच्या मर्जीनेच अरुण लाल हे दुसरा विवाह करत आहेत. शिवाय घटस्फोटानंतरही रीना यांच्या आजारपणामुळे ते दोघे अजूनही सोबतच राहतात. अरुण लाल यांचा जन्म हा १९५५ मध्ये उत्तर प्रदेशात झाला. मात्र, ते बंगालकडून क्रिकेट खेळले. दरम्यान, २०१६ च्या सुमारास अरुण लाल यांना कर्करोग झाला. त्यामुळे त्यांना समालोचनाचे कामही सोडावे लागले.
कर्करोगातून मुक्त झाल्यानंतर त्यांनी बंगाल क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. अरुण लाल आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत भारताकडून १६ कसोटी आणि १३ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत.