पर्थ : ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने अवघ्या एका धावेत ८ बळी गमावल्याने त्यांचा डाव २ बाद ५२ धावांवरून ५३ धावांवर संपुष्टात आला. यानंतर टास्मानियाने ८.३ षटकांमध्येच ३ बाद ५५ धावा करत बाजी मारली. विशेष म्हणजे वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील सर्व ११ खेळाडू हे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत. मात्र, तरीही त्यांची टास्मानियाच्या कमी अनुभव असलेल्या खेळाडूंपुढे दाणादाण उडाली. बेउ वेबस्टरने १७ धावांत ६ बळी घेतले.
बिली स्टॅनलेकने १२ धावांत ३ बळी घेतले. ॲरोन हार्डी (७) झटपट बाद झाल्यानंतर डी'ॲर्सी शॉर्ट (२२) आणि कॅमरून बेनक्रॉफ्ट (१४) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. १४व्या षटकात शॉर्ट, तर १६ व्या षटकात बेनक्रॉफ्ट बाद झाल्यानंतर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला गळती लागली. त्यांचे तब्बल सहा फलंदाज शून्यावर परतले. केवळ शॉर्ट व बेनक्रॉफ्ट यांनीच दुहेरी धावसंख्या गाठली. यानंतर मिचेल ओवेन (२९) आणि मॅथ्यू वेड (२१*) यांच्या जोरावर टास्मानियाने सहज विजय मिळवला. जोएल पॅरिसने २, तर लान्स मॉरिसने एक बळी घेतला.