कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडवर वनडे मालिकेत शानदार विजय नोंदवला. इंदूरमधील शेवटची वनडे जिंकून भारतीय संघाने मालिका ३-० ने आपल्या नावावर केली. ही मालिका टीम इंडियाचा स्टार ओपनिंग बॅट्समन शुभमन गिलसाठी (Shubhman Gill) अतिशय धमाकेदार झाली. या मालिकेत त्याने १ द्विशतक आणि १ शतक झळकावले. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजीदरम्यान एक मजेशीर घटना घडली.
न्यूझीलंडची फलंदाजी सुरू होती आणि शुभमन गिल बॉंड्रीजवळ फिल्डिंग करत होता, यावेळी प्रेक्षकांनी साराच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. 'हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो' असे चाहते म्हणू लागले. शुभमन गिलने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र विराट कोहलीने दिलेली रिॲक्शनची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
शुभमन गिलचे नाव बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडले जात आहे. मात्र गिलने या विषयावर कधीही त्याची बाजू मांडली नाही. एकवेळ अशी होती जिथे शुभमन गिलचे नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्यासोबत जोडलं जातं होतं. मात्र त्यानंतर अशी बातमी समोर आली की, दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं आहे. मात्र सारा नंतर आणखी एक सारा म्हणजेच सारा अली खानची एंट्री झाली. सारा अली खानला अनेकदा डिनर आणि पार्टीमध्ये एकत्र स्पॉट केलं होतं.
दरम्यान, शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात २०८ धावांची धडाकेबाज खेळी केली. हे करत तो द्विशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला. दुसऱ्या वनडेत त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. मात्र तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या गोलंदाजांना तारे दाखवत शतक झळकावले. या तीन डावांसह गिलने केवळ ३ सामन्यात १८० च्या सरासरीने ३६० धावा केल्या.
शुभमनने केली बाबर आझमच्या विक्रमाशी बरोबरी-
शुभमन गिलनेही तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला. त्याने या मालिकेत ३१४+ धावा करताना विराट कोहलीचा (२८३ धावा वि. श्रीलंका, २०२३) विक्रम मोडला. रोहित शर्मा व शुभमन गिल यांची २०६ धावांची भागीदाही ही न्यूझीलंडविरुद्ध भारतीयांनी केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. रोहित शर्मा ८५ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकार खेचून १०१ धावांवर बाद झाला. शुभमन गिल ७८ चेंडूंत १३ चौकार व ५ षटकारांसह ११२ धावांवर माघारी परतला. तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत सर्वाधिक ३६० धावा करण्याच्या बाबर आजमच्या विक्रमाशी शुभमनने आज बरोबरी केली. बाबरने २०१६मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १२०च्या सरासरीने ३६० धावा केल्या होत्या. शुभमनने न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत १८०च्या सरासरीने ३६० धावा करून बाबरशी बरोबरी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"