कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड हा त्याच्या स्फोटक फटकेबाजीसोबतच मैदानातील गमतीशीर वागण्यामुळे चर्चेत असतो. दरम्यान, दुबई इंटरनॅशनल लीगमध्ये आज एमआय एमिरेट्स आणि शारजाह वॉरियर्स यांच्यात झालेल्या लढतीत बाद झाल्यावर पोलार्डने केलेल्या एका कृतीची चर्चा होत आहे. त्रिफळाचीत झाल्यावर पोलार्डने गोलंदाजावर बॅट उगारल्याने क्षणभर सारेच अवाक झाले होते. या सामन्यात एमआय एमिरेट्सने शारजाह वॉरियर्सवर सहा विकेट्सनी मात केली.
एमआय एमिरेट्सचा संघ निकोलस पुरन आणि पोलार्डच्या फटकेबाजीमुळे विजयाच्या उंबरठ्यावर होता. तेव्हा हा प्रकार घडला. त्याचं झालं असं की, जुनैद सिद्दिकीने टाकलेल्या सतराव्या षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर पोलार्डने चौकार आणि षटकार ठोकला. मात्र पाचव्या चेंडूवर जुनैदने पोलार्डला त्रिफळाचित केले. जुनैदच्या या भन्नाट चेंडूमुळे अवाक झालेला पोलार्ड तोल जाऊन खेळपट्टीवर पडला. त्यानंतर तंबूच्या दिशेने जात असताना पोलार्डने जुनैदच्या दिशेने बॅट उगारली. त्यामुळे क्षणभर काय घडलं हे कुणालाच कळलं नाही. मात्र पुढच्याच क्षणी पोलार्डने ही बॅट जुनैदच्या पोटाला लावली. मग त्याच्या खांद्यावर हात ठेवत काहीतरी सांगून पोलार्ड मैदानातून बाहेर गेला.
पोलार्डने १४ चेंडूत २ षटकारांसह १९ धावा काढल्या. दरम्यान, या सामन्यात शारजाह वॉरियर्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांमध्ये १४६ धावा काढल्या होत्या. या आव्हानाचा एमआय एमिरेट्स संघाने १७.१ षटकांत ४ विकेट्स राखून आरामता पाठलाग केला.