PAK vs BAN Test : पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला मायदेशात बांगलादेशकडून कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला. बांगलादेश दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. सलामीचा सामना जिंकून पाहुण्या बांगलादेशने १-० अशी आघाडी घेतली. पाकिस्तानच्या पराभवामुळे शेजारील देशातील माजी खेळाडू पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बोचरी टीका करत आहेत. अनेकजण शान मसूदच्या संघावर तोंडसुख घेत आहेत. अशातच पाकिस्तानचे माजी खेळाडू आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचा समाचार घेतला.
रावळपिंडी येथील तुरुंगात असलेल्या खान यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला लक्ष्य केले. ते म्हणाले की, क्रिकेट हा खेळ पाकिस्तानात खूप आवडीने खेळला जातो. पण, ताकदवान लोकांनी याला देखील बर्बाद केले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना तिथे बसवले आहे. पहिल्यांदाच पाकिस्तानचा संघ विश्वचषकाच्या पहिल्या आठमध्ये जागा मिळवू शकला नाही.आता आपण बांगलादेशकडून पराभूत झालो. दीड वर्षापूर्वी याच संघाने भारताचा दहा गडी राखून पराभव केला होता. पण, आता असे का होत नाही हा प्रश्न आहे. पाकिस्तानच्या संघाच्या खराब कामगिरीला बोर्ड कारणीभूत आहे. खरे तर पाकिस्तानने इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली १९९२ मध्ये पहिल्यांदा वन डे विश्वचषक जिंकला होता. नक्वी यांच्यावरही खान यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ -
शान मसूद (कर्णधार), सौद शकील, आमिर जमाल, अबरार अहमद, अब्दुला शफीक, बाबर आझम, कामरान घुलाम, खर्राम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरेर्या, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैय अयुब, सलमान अली अघा, सरफराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी.
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ६ बाद ४४८ धावा करून डाव घोषित केला. मग बांगलादेशने प्रत्युत्तरात असामान्य कामगिरी केली. त्यांनी सर्वबाद ५६५ धावा करून शेजाऱ्यांना घाम फोडला. दुसऱ्या डावात पाकिस्तानला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यांनी केवळ १४६ धावा केल्याने बांगलादेशला विजयासाठी अवघ्या ३० धावांची गरज होती. बांगलादेशने एकही गडी न गमावता ३० धावा करून पहिला सामना आपल्या नावावर केला.
Web Title: As soon as Pakistan lost the PAK vs BAN Test, former Prime Minister Imran Khan criticized the Pakistan Cricket Board
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.