पाकिस्तानचे माजी आयसीसी एलीट पॅनलचे अम्पायर असद रौफ (Asad Rauf) याचं वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झालं आहे. हृदविकाराच्या झटक्यामुळे रौफ यांचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रौफ यांच्या जाण्यानं पाकिस्तान क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. नुकताच रौफ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात ते पाकिस्तानातील एका बाजारात बुट आणि कपड्यांचं दुकान चालवत असल्याचं समोर आलं होता.
भ्रष्टाचार विरोधी नियमांचं उल्लंघन केल्याच्या प्रकरणात दोषी आढळल्यामुळे असद रौफ यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं पाच वर्षांची बंदी घातली होती. या शिक्षेमुळे रौफ यांना बीसीसीआयशी संबंधित कोणत्याही स्पर्धेत पंच म्हणून काम करता येत नव्हतं. आयपीएल २०१३ मधील सट्टेबाजी प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात रौफ यांचा वॉंटेड आरोपी म्हणून समावेश केला होता.
आयसीसीच्या एलीट पॅनलचे सदस्य राहिलेल्या असद रौफ यांनी साल २००० ते २०१३ या कालावधीत तब्बल २३१ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये पंचाची भूमिका पार पाडली होती. रौफ यांचं कामही उत्तम होतं. जगातील सर्वोत्तम पंचांपैकी ते एक होते. १९९८ साली रौफ यांनी या क्षेत्रात पहिल्यांदा पाऊल टाकलं. पंच होण्याआधी रौफ यांनी पाकिस्तानच्या स्थानिक क्रिकेटमध्ये करिअरला सुरुवात केली होती. १९८० च्या दशकात ते उत्तम फलंदाज म्हणून ओळखले जात होते. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ७१ सामन्यात ३४२३ धावा केल्या आहेत. तर ४० लिस्ट-ए सामन्यांत ६११ धावा केल्या आहेत.
Web Title: Asad Rauf former ICC elite umpire from Pakistan, dies aged 66
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.