अफगाणिस्तान : वर्ल्ड कप स्पर्धेला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना शुक्रवारी अफगाणिस्तान क्रिकेट संघात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने वन डे क्रिकेट संघाचा कर्णधार असघर अफघानला पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी वर्ल्ड कप स्पर्धेत गुलबदीन नैब हा संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या या निर्णयावर आघाडीचे फिरकीपटू रशीद खान आणि मोहम्मद नबी यांनी तीव्र नाराजी प्रकट केली आहे. त्यांनी निवड समितीवर विरोधाची तोफ डागली.
2015 मध्ये मोहम्मद नबी याच्याकडून नेतृत्वाची जबाबदारी असघरकडे सोपवण्यात आली होती. त्याच्याच नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघाने आयसीसीच्या पूर्ण सदस्यत्वाचा दर्जा मिळवला होता आणि त्यांनी आयर्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला होता.
निवड समितीच्या या निर्णयावर रशीद म्हणाला की,''निवड समितीचा मी आदर राखतो, परंतु त्यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत चुकीचा, बेजबाबदार आणि पक्षपाती आहे. क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आहे आणि असघरच कर्णधार हवा आहे. त्याच्या नेतृत्वकौशल्याने संघाने अनेक विजय मिळवले आहेत.''
तो पुढे म्हणाला,''वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आली आहे आणि कर्णधार बदलल्याने संघाचे मनोबल खचण्याची शक्यता आहे. ''
संघातील वरिष्ठ खेळाडू मोहम्मद नबी म्हणाला,''वरिष्ठ खेळाडू म्हणून मी संघाची वाटचाल पाहत आलो आहे. वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असा निर्णय घेणे योग्य नव्हे. असघरच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करत आहे.''