बर्मिंगहॅम, अॅशेस 2019 : ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 284 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत 1 बाद 71 धावा केल्या आहेत. रॉरी बर्न्स ( 41) आणि जो रूट ( 11) खेळपट्टीवर तग धरून आहेत. जेसन रॉय ( 10) आठव्याच षटकात जेम्स पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पण, डावाच्या 21 व्या षटकात इंग्लंडला दुसरा धक्का बसला असता, परंतु नशीब बलवत्तर म्हणून यजमानांना धक्का बसला नाही.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाचे 8 फलंदाज 122 धावांत तंबूत परतले होते. मात्र, स्टीव्हन स्मिथनं एका बाजूनं खिंड लढवली, त्यानं अनुभवी गोलंदाज पीटर सिडलसह नवव्या विकेटसाठी 88, तर नॅथन लियॉनसह दहाव्या विकेटसाठी 74 धावांची भागिदारी करून इंग्लंडच्या गोलंदाजांच्या डोळ्यात पाणी आणलं. वॉर्नर आणि बँक्रॉफ्ट ही सलामीची जोडी अवघ्या 17 धावांत माघारी पाठवून ब्रॉडनं इंग्लंडला मोठं यश मिळवून दिले. त्यानंतर वोक्सने मधल्या फळीतील फलंदाज उस्मान ख्वाजा आणि ट्रॅव्हीस हेड यांनाही बाद केले. मॅथ्यू वेड, टीम पेन, जेम्स पॅटीन्सन, पॅट कमिन्स यांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही.
स्मिथ एका बाजूनं खिंड लढवत होता. त्यानं 219 चेंडूंत 16 चौकार व 2 षटकारांसह 144 धावा केल्या. सिडलनेही 85 चेंडूंत 44 धावा केल्या. स्मिथचे हे कसोटी क्रिकेटमधील 24वे शतक ठरलं. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 24 शतकं करणारा तो दुसरा फलंदाज बनला. त्यानं या विक्रमात कोहलीला मागे टाकले. स्मिथनं 118 डावांत हा पल्ला गाठला. या विक्रमात सर डॉन ब्रॅडमन ( 66 डाव) अव्वल स्थानावर आहेत. कोहलीला हा पल्ला गाठण्यासाठी 123 डाव खेळावे लागले. 8 बाद 122 वरून ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 284 धावा केल्या.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील 21 व्या षटकात पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर चेंडू यष्टिला घासून गेला. जो रूटला बाद ठरवण्यासाठी ऑसी खेळाडूंनी अपील केले आणि पंचांनीही त्याला झेलबाद दिले. पण, रूटने DRS घेतला. त्यात चेंडू बॅटला न लागल्याचे स्पष्ट दिसत होते, परंतु वेगाने आलेला चेंडू स्टम्पला घासून गेल्याचे दिसत होते. पण, बेल्स न पडल्यानं खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानही असे प्रकार अनेकदा घडले होते.
पाहा व्हिडीओ...