अॅशेस 2019: स्टीव्ह स्मिथनं दोन्ही डावांत केलेले शतक आणि नॅथन लियॉनच्या फिरकीची कमाल, याच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं अॅशेस कसोटी मालिकेचा पहिला सामना मोठ्या फरकानं जिंकला. या पराभवामुळे यजमान इंग्लंड 0-1 अशा पिछाडीवर गेले असून दुसरा सामना 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लॉर्ड्स स्टेडियमवर लाल चादर पसरलेली पाहायला मिळणार आहे. शिवाय दोन्ही संघांतील खेळाडूही लाल जर्सीत दिसतील. जाणून घेऊया या मागचं कारण... फुफ्फुसाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्याचा हा प्रयत्न असणार आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्य्रु स्ट्रॉस याची पत्नी रुथ स्ट्रॉसला हा दुर्मिळ आजार झाला होता आणि गतवर्षी तिला प्राण गमवावे लागले होते. तिच्या नावानं सुरू केलेल्या रुथ स्ट्रॉस फाऊंडेशनला निधी मिळावा, यासाठी लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लाल पोशाख परिधान केलेले प्रेक्षक दिसतील. इंग्लंड क्रिकेट मंडळ आणि मेरीलेबोन क्रिकेट क्लब यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवला आहे. अँड्य्रु स्ट्रॉस म्हणाला,''लॉर्ड्सवर रुथ स्ट्रॉस फाऊंडेशन साजरा करणारा दिवस हा केवळ रुथला आदरांजली वाहण्यासाठीचा दिवस नसेल, तर त्यातून या दुर्मिळ आजाराबद्दल जनजागृती केली जाणार आहे. या सामन्यातून मिळणारा निधी हा या आजारावर उपचार शोधण्यासाठी लागणाऱ्या संशोधनासाठी वापरला जाणार आहे.'' दरम्यान, पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून 286 धावा करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. स्मिथन पहिल्या डावात 144 आणि दुसऱ्या डावात 142 धावांची खेळी केली. स्मिथचे हे कसोटी क्रिकेटमधील 25वे शतक ठरले.
इंग्लंडला मोठा धक्का; प्रमुख गोलंदाजाची दुखापतीमुळे लॉर्ड्स कसोटीतून माघारइंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतीतून सावरला नाही, त्यामुळे त्याने दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात केवळ चार षटकं टाकून अँडरसन मैदनाबाहेर गेला होता. त्याच्या पोटरीला दुखापत झाली होती आणि MRIच्या अहवालात ही दुखापत बरी झाली नसल्याचे उघड झाले.