अॅशेस 2019 : स्टीव्ह स्मिथनं दोन्ही डावांत केलेले शतक आणि नॅथन लियॉनच्या फिरकीची कमाल, याच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं अॅशेस कसोटी मालिकेचा पहिला सामना मोठ्या फरकानं जिंकला. या पराभवामुळे यजमान इंग्लंड 0-1 अशा पिछाडीवर गेले असून दुसरा सामना 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंड संघाने शनिवारी 12 सदस्यीय संघ जाहीर केला असून त्यात फिरकीपटून मोईन अलीला डच्चू देण्यात आला आहे.
जुलै महिन्यात आयर्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी लीच इंग्लंडकडून खेळला होता आणि सलामीला खेळताना त्यानं 92 धावांची खेळी केली होती. प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसन आणि ऑली स्टोन या दोघांनीही दुखापतीमुळे माघार घेतली आहे. पहिल्या कसोटीत अँडरसनला दुखापत झाली होती.
संघ - जो रूट ( कर्णधार), जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम कुरन, जोए डेन्ली, जऐक लीच, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स.
लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लाल 'सलाम', जाणून घ्या कारण!यजमान इंग्लंड 0-1 अशा पिछाडीवर गेले असून दुसरा सामना 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लॉर्ड्स स्टेडियमवर लाल चादर पसरलेली पाहायला मिळणार आहे. शिवाय दोन्ही संघांतील खेळाडूही लाल जर्सीत दिसतील. जाणून घेऊया या मागचं कारण...
फुफ्फुसाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्याचा हा प्रयत्न असणार आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्य्रु स्ट्रॉस याची पत्नी रुथ स्ट्रॉसला हा दुर्मिळ आजार झाला होता आणि गतवर्षी तिला प्राण गमवावे लागले होते. तिच्या नावानं सुरू केलेल्या रुथ स्ट्रॉस फाऊंडेशनला निधी मिळावा, यासाठी लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लाल पोशाख परिधान केलेले प्रेक्षक दिसतील. इंग्लंड क्रिकेट मंडळ आणि मेरीलेबोन क्रिकेट क्लब यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवला आहे.