बर्मिंगहॅम, अॅशेस 2019 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ( 2018) कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ, डेव्हीड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट या तिघांनी जी चूक केली, त्याची पुरेशी शिक्षा त्यांना मिळाली. हे तिघेही सध्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचे सदस्य आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात पिछाडीवरून मुसंडी मारताना यजमान इंग्लंडला पराभवाची चव चाखवली. या सामन्यात दोन्ही डावांत शतकी खेळी करणाऱ्या स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. स्मिथने संघ अडचणीत असताना परिपक्व खेळी केली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता माजी कर्णधार रिकी पॉटिंगने संघाचे नेतृत्व पुन्हा स्मिथकडे सोपवण्याची मागणी केली आहे. त्यानं स्मिथवर टीका करणाऱ्यांनाही झापलं आहे. अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी स्मिथ कर्णधार टीम पेनला काही सल्ला देत होता. त्याच्या या कृतीवर नेटीझन्स चांगलेच खवळले. त्यानं स्मिथला तू कर्णधार नाहीस, याची आठवण करून दिली. त्यावर पॉटिंगने नेटीझन्सचा समाचार घेतला.
स्मिथला पुन्हा कर्णधार झालेलं पाहायला आवडेल, असंही पॉटिंग म्हणाला. मार्च 2020 पर्यंत स्मिथ ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करू शकणार नाही. तो म्हणाला,''मी याचा विचार केलेला नाही, परंतु त्याला पुन्हा कर्णधार झालेलं पाहताना मला आवडेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही कदाचित तसेच वाटत असावे म्हणून त्याच्यावर आजीवन बंदी घातलेली नाही. त्याला कर्णधारपदापासून दोन वर्ष दूर राहण्याची शिक्षा त्यांनी दिली आहे. त्यामुळे तो पुन्हा कर्णधार व्हायला हवा.''