बर्मिंगहॅम, अॅशेस 2019 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेला गुरुवारपासून सुरूवात झाली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवातही याच सामन्यातून झाल्यानं सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पहिल्याच दिवशी नाट्यमय खेळ झाला. स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्स यांच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्करलेल्या ऑस्ट्रेलियाला स्टीव्हन स्मिथनं पुन्हा ताठ मानेनं उभं केलं. स्मिथनं या डावात शतकी खेळी करून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा विश्वविक्रम मोडला. स्मिथनं आपल्या अप्रतिम खेळानं इंग्लंडला रडवलेच नाही, तर कोहलीलाही मागे टाकले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाचे 8 फलंदाज 122 धावांत तंबूत परतले होते. मात्र, स्टीव्हन स्मिथनं एका बाजूनं खिंड लढवली, त्यानं अनुभवी गोलंदाज पीटर सिडलसह नवव्या विकेटसाठी 88, तर नॅथन लियॉनसह दहाव्या विकेटसाठी 74 धावांची भागिदारी करून इंग्लंडच्या गोलंदाजांच्या डोळ्यात पाणी आणलं. 8 बाद 122 वरून ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 284 धावा केल्या. चेंडू कुरतडल्याप्रकरणी शिक्षा पूर्ण करणारे स्मिथ, डेव्हीड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट हे तिघेही प्रथमच कसोटी संघात एकत्र खेळले. इंग्लंडच्या चाहत्यांनी या तिघांना सँडपेपर दाखवून डिवचलेही. पण, स्मिथने या सर्वांना चोख प्रत्युत्तर दिले.