अॅशेस 2019 : ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटीत दिमाखदार विजय मिळवून अॅशेस चषक आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. 2001 नंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये अॅशेस मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलिया 2-1 अशा आघाडीवर आहे आणि मालिकेतील अखेरचा सामना गुरुवारपासून ओव्हलवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला 43 वर्षांपूर्वीचा कसोटीतील विश्वविक्रम नावावर करण्याची संधी आहे. स्मिथचा फॉर्म पाहता तो हा विश्वविक्रम नावावर नक्की करेल, असा विश्वास सर्वांना आहे. स्मिथ आणि गोलंदाज पॅट कमिन्स यांनी ऑस्ट्रेलियाला अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत इंग्लंडवर 185 धावांनी विजय मिळवून दिला. या सामन्यात स्मिथ आणि कमिन्स यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. स्मिथने या सामन्यात 211 व 82 धावांची खेळी केली. कमिन्सने चौथ्या कसोटीत 103 धावांत 7 विकेट्स घेतल्या. या संपूर्ण मालिकेत आतापर्यंत स्मिथनं तीन कसोटी सामन्यांत केवळ पाच डावांत सर्वाधिक 671 धावा केल्या आहेत. स्मिथला विश्वविक्रम नावावर करण्यासाठी अखेरच्या कसोटीत 159 धावा कराव्या लागणार आहेत, तर त्याच्या नावावर चार सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम होईल. या विक्रमात सध्या वेस्ट इंडिजचे दिग्गज सर व्हीव्हीयन रिचर्ड्स आणि भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर आघाडीवर आहेत. गावस्कर यांनी 1970-71च्या विंडीजविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 774 धावा केल्या होत्या. त्यांचा हा विक्रम चार वर्षांनी रिचर्ड्स ( 829 धावा) यांनी मोडला. स्मिथनं आतापर्यंत तीन सामन्यांत 144, 142, 91, 211 आणि 82 धावा केल्या आहेत. तीन सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ग्रॅहम गूच ( 752 वि. भारत) आणि ब्रायन लारा ( 688 वि. श्रीलंका) आघाडीवर आहेत. स्मिथला रिचर्ड्स यांचा 829 धावांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. अॅशेस मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी 1930 च्या मालिकेत 974 धावा केल्या होत्या. स्मिथला हा विक्रम मोडण्यासाठी 304 धावा कराव्या लागणार आहेत.