Ashes 2021 3rd Test Day 1: अॅशेस मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकाराल्यानंतर तिसऱ्या कसोटीतही इंग्लंडच्या संघाची सुरूवात अतिशय खराब झाली. पहिल्या दिवशी पूर्ण वेळदेखील इंग्लंडच्या फलंदाजांना मैदानावर तग धरता आला नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधाराने इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी ढकललं आणि अवघ्या १८५ धावांत त्यांची दांडी गुल केली. कर्णधार पॅट कमिन्सने ३ तर फिरकीपटू नॅथन लायनने ३ बळी टिपले. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या संघाने एक गड्याच्या मोबदल्यात ६१ धावाही केल्या.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्याचा निर्णय सार्थ ठरवला. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर हसीब हमीद (०) आणि जॅक क्रॉली (१२) स्वस्तात बाद झाले. डेव्हिड मलानही १४ धावांवर माघारी परतला. कर्णधार जो रूटने एक बाजू लावून धरली. त्याने ८२ चेंडूत अर्धशतक झळकावले. पण त्याला बेन स्टोक्स (२५), जॉनी बेअरस्टो (३५), जोस बटलर (३), मार्क वूड (६) यांच्याकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. ओली रॉबिन्सन (२२) आणि जॅक लीच (१३) यांनी शेवटच्या विकेटसाठी काही काळ संघर्ष केला. पण अखेर त्यांचा डाव १८५ धावांमध्येच आटोपला.
पॅट कमिन्स गोलंदाजी करताना कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करत ३६ धावांत ३ बळी टिपले. नॅथन लायननेही ३६ धावा देऊन ३ गडी माघारी धाडले. मिचेल स्टार्कला थोडासा मार पडला पण त्याने ५४ धावा देत २ बळी घेतले. स्कॉट बोलंड आणि कॅमेरॉन ग्रीनने प्रत्येकी १ बळी घेतला.
इंग्लंडचा पहिला डाव संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी दमदार सुरूवात केली. डेव्हिड वॉर्नर झटपट धावा जमवत असताना ३८ धावांत ४२ धावा करून बाद झाला. जेम्स अँडरसनने त्याला झेलबाद केले. मार्कस हॅरिस संयमी खेळी करत २० धावांवर नाबाद राहिला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याला नाईट वॉचमन नॅथन लायनने (०*) साथ दिली.