Join us  

AUS vs ENG : पॅट कमिन्सनं कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात करिष्मा दाखवला; १२७ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाकडून असा पराक्रम झाला

Australia vs England, 1st Test:  अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्याच कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं पहिल्याच दिवशी पाहुण्या इंग्लंडला इंगा दाखवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 10:35 AM

Open in App

Australia vs England, 1st Test:  अ‍ॅशेस मालिकेतील ( Ashes Series) पहिल्याच कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं पहिल्याच दिवशी पाहुण्या इंग्लंडला इंगा दाखवला. पॅट कमिन्सच्या ( Pat Cummins) नेतृत्वाखाली प्रथमच खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियानं पहिल्याच दिवशी इंग्लंडचा डाव १४७ धावांवर गुंडाळला. पॅट कमिन्सनं पाच विकेट्स घेतल्या आणि कसोटीत कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात पाच विकेट्स घेणारा तो जगातील १२वा आणि दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. इंग्लंडनं यावेळी एक नामुष्की टाळली. २००० साली वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांचा डाव ४९.१ षटकांत ८२ धावांवर गुंडाळला गेला होता. त्यानंतर आज ५०.१ षटकांत इंग्लंडचा डाव गडगडला. ही त्यांची दुसरी लहान खेळी ठरली. कमिन्सनं यावेळी १२७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली. ३९ वर्षांनंतर अॅशेसमध्ये पाच विकेट्स घेणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे.  

नाणेफेक जिंकून  इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स  व जोश हेझलवूड या आग ओकणाऱ्या गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. स्टार्कनं दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर भन्नाट यॉर्कर टाकून रोरी बर्न्सचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पॅट कमिन्स व हेझलवूड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत इंग्लंडचा निम्मा संघ ६० धावांवर माघारी पाठवला. दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या बेन स्टोक्सकडे सर्वांच्या नजरा होत्या, परंतु कमिन्सनं अप्रितम चेंडू टाकून त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. 

ओली पोप व जोस बटलर यांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. स्टार्कनं ही जोडी तोडली. बटलर ३९ धावांवर बाद झाला, त्यानंतर पुन्हा इंग्लंडची गाडी घसरली. पोप ३५ धावावंर बाद झाला. इंग्लंडचा पहिला डाव १४७ धावांवर गडगडला. पॅट कमिन्सनं १३.१ षटकांत ३८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. हेझलवूड व स्टार्क यांनी अनुक्रमे दोन विकेट्स घेतल्या, तर कॅमेरून ग्रीननं पहिली कसोटी विकेट घेतली. कमिन्सनं पाच विकेट्स  घेत १२७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली. कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेणारा तो दुसरा ऑसी गोलंदाज ठरला. यापूर्वी १८९४मध्ये जॉर्ज गिफन ( 6-155)  यांनी मेलबर्नवर हा पराक्रम केला होता.  

 

टॅग्स :अ‍ॅशेस 2019आॅस्ट्रेलियाइंग्लंड
Open in App