ऑस्ट्रेलियानं अॅशेज मालिकेत दमदार कामगिरी करताना इंग्लंडला चारी मुंड्या चीत केलं आहे. पहिल्या तीन कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियानं १२ दिवसांतच अॅशेज मालिका नावावर केली. ३-० अशा आघाडीसह ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीत मैदानावर उतरणार आहे. पण, ट्रॅव्हीस हेड याला कोरोनाची लागण झाल्यानं ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली आहे. त्यातच संघातील प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) हा २०व्या मजल्यावर जवळपास तासभर लिफ्टमध्येच अडकला होता. सहकारी मार्नस लाबुशेन यानं त्याला वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण त्याला यश आले नाही.
स्टीव्ह स्मिथनं त्याचा मित्र व संघातील सहकारी लाबुशेन याच्याकडे मदत मागितली. लाबुशेननं ही रॉडनं लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही अपयश आलं. स्मिथनं हा सर्व प्रसंग मोबाईल व्हिडीओत कैद केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. हॉटेलच्या लिफ्टमध्ये अडकल्यानंतर स्मिथनं बाहेर पडण्यासाठी सर्व प्रयत्न करून पाहिले. सर्व प्रयत्न करून दमल्यानंतर स्मिथ मोबाईलवर कार्टून डिझाईन करताना दिसला. लाबुशेननं लिफ्टच्या फटीतून स्मिथसाठी काहीतरी खाण्याचा पदार्थ देताना दिसला.
या मालिकेत स्मिथला काही खास कामगिरी करता आलेली नाही. त्यानं तीन सामन्यांत ३१.७५च्या सरासरीनं १२७ धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.