Ashes, ENG vs AUS: अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ ३-०ने आघाडीवर आहे. चौथ्या सामन्यादेखील ऑस्ट्रेलियाकडे भक्कम आघाडी असून सामना त्यांच्याच बाजूने झुकलेला आहे. ऑस्ट्रेलियाला चौथ्या सामन्यात मजबूत स्थितीत नेऊन ठेवणारा खेळाडू म्हणजे उस्मान ख्वाजा. तब्बल तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर उस्मान ख्वाजाला संधी मिळाली आणि त्याने दोन्ही डावात दमदार शतकं ठोकत संधीचं सोनं केलं. उस्मान ख्वाजाने पहिल्या डावात २६० चेंडूत १३७ धावा केल्या होत्या. पण दुसऱ्या डावात त्याने वेगवान खेळ केला आणि १३८ चेंडूत १०१ धावा केल्या. अॅशेस मालिकेत अशी कामगिरी करत त्याने विविध विक्रमांना गवसणी घातली.
अॅशेस मालिकेत तब्बल २५ वर्षांनंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाने दोन्ही डावात शतक झळकावले. याआधी स्टीव्ह वॉ याने अशी कामगिरी केली होती. आणखी एक बाब म्हणजे, ख्वाजाने सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांचाही विक्रम मोडला. आशिया खंडात जन्म झालेल्या क्रिकेटपटूंपैकी ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत उस्मान ख्वाजाने साऱ्यांनाच मागे टाकलं. ख्वाजाच्या नावे आता ऑस्ट्रेलियात ८ शतके आहेत. तर सचिन आणि विराटच्या नावे प्रत्येकी ६ आणि सुनील गावसकर यांच्या नावे ५ शतके आहेत.
उस्मान ख्वाजाने दुसऱ्या डावात वेगाने धावा जमवल्या. सिडनीच्या मैदानावर त्याने १० चौकार आणि २ षटकार खेचत १०१ धावा केल्या. या १०१ धावांच्या खेळीमुळे त्याने आणखी एक पराक्रमही केली. सिडनीच्या क्रिकेट ग्राऊंडवर दोन्ही डावात शतक ठोकणार उस्मान ख्वाजा केवळ तिसरा फलंदाज ठरला.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडला पहिल्या डावात २९४ धावांवर बाद केल्यामुळे त्यांच्याकडे भक्कम आघाडी होती. ती आघाडी आणखी वाढवत त्यांनी दुसरा डाव ६ बाद २६५ वर घोषित केला आणि इंग्लंडला ३८८ धावांचे आव्हान दिले.