Ashes 2023 : इंग्लंडने पहिल्या दिवशी ८ बाद ३९३ धावांवर घोषित केलेला डाव ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडेल असे दिसतेय. उस्मान ख्वाजाच्या १४१ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३८६ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडचा संघ केवळ ७ धावांची आघाडी घेऊन मैदानावर उतरला अन् दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने त्यांना बॅकफूटवर फेकले. पहिल्या डावातील शतकवीर जो रूट ( Joe Root) दुसऱ्या डावात आक्रमक खेळला, परंतु ऑसी गोलंदाजांनी त्याचा पद्धतशीर गेम केला. १३१ कसोटी डावांत रूट प्रथमच स्टम्पिंग झाला. पॅट कमिन्सने टाकलेल्या वेगवान यॉर्करची रंगली चर्चा.. त्याच्या भन्नाट चेंडूने ओली पोपची झोप उडाली.
झॅक क्रॅवलीने ६१ आणि ऑली पोपने ३१ धावा करताना इंग्लंडची गाडी रुळावर आणली होती. जो रूटने १५२ चेंडूंत नाबाद ११८ धावा केल्या. हॅरी ब्रुकने ३७ चेंडूंत ३२ धावांची खेळी केली. बऱ्याच दिवसानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जॉनी बेअरस्टोने ७८ चेंडूंत ७८ धावांची खेळी करून रूटला चांगली साथ दिली. नॅथन लाएनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. इंग्लंडने पहिल्या दिवशीच ८ बाद ३९३ धावांवर असताना डाव घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा ( १४१), ट्रॅव्हिस हेड ( ५०), अॅलेक्स केरी ( ६६), कॅमेरून ग्रीन ( ३८) व पॅट कमिन्स ( ३८) यांनी चांगला खेळ करून संघाला ३८६ धावांपर्यंत पोहोचवले.