Ashes 2023 : क्रिकेटच्या पंढरीत कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात जुनी ॲशेस मालिका आजपासून सुरू झाली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या या परंपरागत मालिकेची सर्वच प्रतीक्षा पाहत होते. इंग्लंडची 'बॅझबॉल' स्टाईल ऑस्ट्रेलियावर केवढी भारी पडले, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यात इंग्लंडने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् सलामीवीर झॅक क्रॅवलीने पहिलाच चेंडू खणखणीत टोलवून चौकार मिळवला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स अवाक् झाला. याच क्रॅवलीने अर्धशतक झळकावताना इंग्लंडला २० षटकांच्या आत तिहेरी आकड्यापर्यंत पोहोचवले. हा क्रॅवली ४० धावांवर झेलबाद झाला होता, परंतु कोणीच अपील न केल्याने त्याला जीवदान मिळाले.
सर्वाधिक ॲशेस मालिका खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये जेम्स अँडरसनने सातवे स्थान पटकावले. त्याने २००६ ते २०२३ या कालावधीत १० ॲशेस मालिका खेळल्या. ऑस्ट्रेलियाच्या सीड ग्रेगॉरी यांनी १८९० ते १९१२ या कालावधीत सर्वाधिक १५ ॲशेस मालिका खेळल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या जॅक ब्लॅकहॅम ११ ( १८८२-९४), इंग्लंडच्या जॉनी ब्रिग्स ११ ( १८८४-९९), विलफ्रेड ऱ्होड्स ११ ( १८९९ - १९२६), जॅक होब्स १० ( १९०८-३०) आणि कॉलिन कॉवड्रेय १० ( १९५४-७५) यांचा क्रमांक येतो. क्रॅवलीने चौकाराने डावाची सुरुवात केली खरी, परंतु बेन डकेटची यावेली त्याला साथ मिळाली नाही. १२ धावांवर डकेटला ऑसी गोलंदाज जोश हेझलवूडने झेलबाद केले. मिचेल स्टार्कच्या जागी हेझलवूडने आज प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवली.