Join us  

Ashes 2023: पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे त्रिशतक, इंग्लंडच्या बॅझबॉलला कांगारूंचे आक्रमक उत्तर

Ashes 2023: ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर दुसऱ्या ॲशेस कसोटीत यजमान इंग्लंडविरुद्ध पहिल्या दिवशी ८३ षटकांत ५ बाद ३३९ धावा केल्या. वेगवान गोलंदाज जोश टंग आणि जो रुट यांनी मोक्याच्या वेळी प्रत्येकी दोन बळी घेतले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 6:37 AM

Open in App

लंडन - ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर दुसऱ्या ॲशेस कसोटीत यजमान इंग्लंडविरुद्ध पहिल्या दिवशी ८३ षटकांत ५ बाद ३३९ धावा केल्या. वेगवान गोलंदाज जोश टंग आणि जो रुट यांनी मोक्याच्या वेळी प्रत्येकी दोन बळी घेतले. 

इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून देताना १४० चेंडूंत ७३ धावांची सलामी दिली. टंगने ख्वाजासह वॉर्नरला त्रिफळाचित केले. ख्वाजाने ७० चेंडूंत २ चौकारांसह १७, तर वॉर्नरने ८८ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ६६ धावा केल्या. मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी तिसऱ्या गड्यासाठी १५५ चेंडूंत १०२ धावांची भागीदारी केली. ओली रॉबिन्सनने लाबुशेनला बाद केले. त्याने ९३ चेंडूंत ७ चौकारांसह ४७ धावा केल्या. यानंतर मात्र ट्रॅविस हेडने सामन्याचे चित्रच पालटताना ७३ चेंडूंत १४ चौकारांसह ७७ धावा चोपल्या. त्याने स्मिथसह चौथ्या गड्यासाठी १२२ चेंडूंत ११८ धावांची शानदार भागीदारी केली.  रुटने ७५व्या षटकात हेडसोबतच कॅमरून ग्रीनलाही बाद केले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्मिथ १४९ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ८५, ॲलेक्स कॅरी ३४ चेंडूंत नाबाद ११ धावांवर खेळत होते. 

आंदोलनकर्त्यांचा हंगामासामन्याला सुरुवात झाल्यानंतर काही वेळाने ‘जस्ट स्टॉप ऑईल’ या आंदोलनाचा परिणाम दिसून आला. यावेळी, दोन आंदोलनकर्त्यांनी मैदानात घुसून नारंगी रंगाची पावडर टाकण्याचा प्रयत्न केला. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी त्यांना रोखले. इंग्लंडचा यष्टिरक्षक जॉनी बेयरस्टो याने एका आंदोलनकर्त्याला उचलून सीमारेषेजवळ नेत सुरक्षारक्षकांकडे सोपविले. यामुळे खेळ जवळपास पाच मिनिटे थांबला होता. याप्रकरणी पोलिसांनी तीन व्यक्तींना अटक केली. याआधीही इंग्लंडमध्ये आयोजित झालेल्या अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये या आंदोनकर्त्यांनी व्यत्यय आणल्याची माहिती पोलिसांनी दिली. इंग्लंडमधील एका पर्यावरणप्रेमी समूहाला जस्ट स्टॉप ऑईल नावाने ओळखले जाते. ब्रिटिश सरकारला इंधन परवाना प्रदान करण्यापासून रोखण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

धावफलक ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. टंग ६६, उस्मान ख्वाजा त्रि. गो. टंग १७, मार्नस लाबुशेन झे. बेयरस्टो गो. रॉबिन्सन ४७, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे ८५, ट्रॅविस हेड यष्टीचित बेयरस्टो गो. रुट ७७, कॅमरून ग्रीन झे. अँडरसन गो. रुट ०, ॲलेक्स कॅरी खेळत आहे ११. अवांतर - ३६. एकूण : ८३ षटकांत ५ बाद ३३९ धावा.

बाद क्रम : १-७३, २-९६, ३-१९८, ४-३१६, ५-३१६. गोलंदाजी : जेम्स अँडरसन १५-४-२९-०; स्टुअर्ट ब्रॉड १८-४-७२-०; ओली रॉबिन्सन २१-३-८६-१; जोश टंग १८-३-८८-२; बेन स्टोक्स ३-१-२१-०; जो रुट ८-१-१९-२.

लायनचे अनोखे शतककसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलग शंभर सामने खेळणारा ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नाथन लायन पहिला गोलंदाज ठरला. अशी कामगिरी करणारा तो एकूण सहावा क्रिकेटपटू ठरला असून याआधी ॲलिस्टर कूक (१५९), ॲलेन बॉर्डर (१५३), मार्क वॉ (१०७), सुनील गावसकर (१०६) आणि ब्रेंडन मॅक्क्युलम (१०१) यांनी असा पराक्रम केला आहे.

टॅग्स :अ‍ॅशेस 2019आॅस्ट्रेलियाइंग्लंड
Open in App