Ashes 2023 ENG vs AUS : ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने २ विकेट्स राखून जिंकली. २८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उस्मान ख्वाजा ( ६५) आणि कर्णधार पॅट कमिन्स ( ४४*) यांची खेळी महत्त्वाची ठरली. चौथ्या दिवशीच इंग्लंडने ३ विकेट्स मिळवल्या होत्या अन् पाचव्या दिवशी पावसामुळे एक सत्र वाया गेले अन् त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी कागारूंना धक्के दिले. ७१ धावांची गरज असताना भरवशाचा उस्मान बाद झाला पण, कमिन्स अखेरपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला. त्याने ऑस्ट्रेलियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
उस्मान ख्वाजाने वाजवला बाजा! ४३ वर्षापूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, ऑस्ट्रेलियाने ७५ वर्षानंतर इतिहास घडवला
जो रूटच्या नाबाद ११८ धावांच्या जोरावर इंग्लंडने पहिला डाव पहिल्याच दिवशी ८ बाद ३९३ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात उस्मान ख्वाजाच्या १४१ धावांनी ऑस्ट्रेलियाला ३८६ धावांपर्यंत पोहोचवले. इंग्लंडचा दुसरा डाव २७३ धावांवर गडगडला अन् ऑस्ट्रेलियासमोर २८१ धावांचे लक्ष्य उभे राहिले. उस्मान ( ६५), डेव्हिड वॉर्नर ( ३६) हे चांगले खेळले, परंतु बाकीचे फलंदाज ढेपाळले. ७१ धावांची गरज असताना बेन स्टोक्सने उस्मानचा त्रिफळा उडवला अन् इंग्लंडच्या आशा पल्लवित झाल्या. २०९ धावांवर ऑस्ट्रेलियाची ती सातवी विकेट पडली होती. कर्णधार पॅट कमिन्सने तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन मॅच फिरवली अन् नाबाद ४४ धावा करून मॅच जिंकली.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३-२५ या सर्कलमधील ही पहिलीच मॅच होती आणि ऑसींनी बाजी मारली. पण, षटकांची गती संथ राखल्याने ऑसी व इंग्लंड यांच्या खात्यातील दोन गुण ICC ने कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या १२ गुणांमधील दोन कमी झाले, तर इंग्लंडच्या खात्यात वजा २ गुण जमा झालेत. याशिवाय दोन्ही संघांतील खेळाडूंना त्यांच्या मॅच फीमधील ४० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.