Ashes 2023, ENG vs AUS : ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी दर्जेदार खेळाची अनुभूती आली. झॅक क्रॅवलीने पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार खेचून इंग्लंडच्या डावाची सुरूवात केली. जोश हेझलवूड व लॅथन लाएन यांनी इंग्लंडला धक्के दिले, परंतु क्रॅवली व जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक आणि जो रूटच्या शतकाने ऑस्ट्रेलियाला दणके दिले. इंग्लंडने पहिला डाव ८ बाद ३९३ धावांवर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर बिनबाद १४ धावा केल्या. रूट ११८ धावांवर नाबाद असताना डाव घोषित करण्याचा निर्णय बुचकळ्यात टाकणारा होता. पण, या सामन्यात हॅरी ब्रुकची पडलेली विकेट अचंबित करणारी ठरली.
क्रॅवलीने ६१ आणि ऑली पोपने ३१ धावा करताना इंग्लंडची गाडी रुळावर आणली होती. जो रूटने १५२ चेंडूंत नाबाद ११८ धावा केल्या. हॅरी ब्रुकने ३७ चेंडूंत ३२ धावांची खेळी केली. नॅथन लाएनने टाकलेला चेंडू ब्रुकने लेफ्ट केला. चेंडू ब्रुकच्या पॅडवर आदळून हवेत उडाला.. यष्टीरक्षकालाही चेंडू नेमका कुठे गेला हेच कळले नाही, तो कॅच घेण्यासाठी तरीही तयार होता. पण, हा चेंडू खाली टप्पा पडला अन् थेट यष्टिंवर आदळला. ब्रुकच्या या विचित्र विकेटने लाएनलाही हसू आवरले नाही.