लंडन : ॲशेस मालिकेच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत यजमान इंग्लंड संघाचा पहिला डाव पहिल्याच दिवशी गुंडाळला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत इंग्लंडचा पहिला डाव २८३ धावात गुंडाळला. मिचेल स्टार्कने सर्वाधिक चार बळी घेतले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघही चाचपडताना दिसतोय आणि त्यांचे ७ फलंदाज माघारी परतले आहेत. अनुभवी स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) हा एकमेव शिलेदार खिंड लढवताना दिसतोय. पण, सामन्याच्या ७७.३ षटकात वादग्रस्त निकाल पाहायला मिळाला. कर्णधार पॅट कमिन्स आणि स्मिथ यांचा दोन धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आला होता. स्मिथ रन आऊट झालाच होता आणि तो पेव्हेलियनच्या दिशेने निघाला होता. इंग्लंडच्या खेळाडूंनी जल्लोष करायला सुरूवात केली, परंतु तिसरे अम्पायर Nitin Menon यांनी मोठा गेम केला.
इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी चांगली सुरूवात केली. वॉर्नर ( २४) चांगल्या लयमध्ये दिसत होता, परंतु ख्रिस वोक्सने त्याला माघारी पाठवले. मार्नस लाबुशेन ( ९) याला मार्क वूडने चतुराईने बाद केले अन् जो रुटने स्लीपमध्ये अविश्वसनीय झेल टिपला. स्टुअर्ट ब्रॉडने ऑसींच्या सलामीवीर ख्वाजाचा ( ४७) पायजीत पकडले आणि ही त्याची ॲशेस मालिकेतील १५० वी विकेट ठरली. असा पराक्रम करणारा तो इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. ट्रॅव्हिड हेड ( ४) यालाही ब्रॉडने माघारी पाठवले. मिचेल मार्श ( १६), अॅलेक्स केरी ( १०), मिचेल स्टार्क ( ७) हेही झटपट माघारी परतले.
सर्व भिस्त स्मिथवर असताना ७७.३ षटकात दोन धाव घेण्याच्या प्रयत्नात तो जवळपास रन आऊट झाला होता. निर्णय तिसरे पंच नितिन मेनन यांच्याकडे गेला. प्रथमदर्शनी स्मिथलाही आपण बाद असल्याचे वाटले अन् तो पेव्हेलियनच्या दिशेने चालू लागला. इंग्लंडच्या खेळाडूंना महत्त्वाची विकेट मिळाली म्हणून आनंद झाला होता. पण, तिसरे पंच मेनन यांनी रिप्ले पाहिला अन् यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टो याने चेंडू हातात येण्याआधीच ग्लोव्ह्जने बेल्स हलवल्याचे दिसले अन् स्मिथला नाबाद दिले गेले.
Web Title: Ashes 2023 : Out or not out? Steve Smith is very lucky to survive, Jonny Bairstow has made contact with stumps before the ball gets into his gloves, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.