Join us  

Ashes 2023: शतकवीर ख्वाजासाठी लावली 'गल्ली क्रिकेट'ची फिल्डिंग, मिळवली विकेट

एकाच रेषेत ६ ते ७ फिल्डर लावून ख्वाजावर वाढवलं दडपण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 10:20 AM

Open in App

Ashes 2023 AUS vs ENG, Video: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रसिद्ध एशेस मालिका सुरू झाली आहे. एजबॅस्टन कसोटीने क्रिकेटमधील दोन तुल्यबळ संघ एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. ऑस्ट्रेलियासमोर पहिल्या डावात 393 धावा केल्यानंतर इंग्लंड संघाने पाहुण्या संघाला 286 धावांत गुंडाळून 7 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाने इंग्लंडच्या संघाचा चांगलाच घाम काढला. त्याला बाद करण्यासाठी इंग्लंडला अनेक क्लृक्त्या लढवाव्या लागल्या. महत्त्वाचा भाग म्हणजे, त्याला बाद करण्यासाठी लावण्यात आलेल्या फिल्डिंगची विशेष चर्चा रंगली.

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात उस्मान ख्वाजाने शानदार शतक झळकावले. 139 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात जन्म न झालेल्या खेळाडूने अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले. हा एक मोठा आणि महत्त्वाचा विक्रम झाला. इस्लामाबाद, पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या उस्मान ख्वाजाने 141 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले. या खेळीमुळे ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडला मोठी आघाडी घेण्यापासून रोखू शकला. पण इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ख्वाजाची विकेट घेण्यासाठी खास फिल्डिंग लावली. इंग्लिश कर्णधाराच्या फिल्ड सेटिंगचा हा परिणाम होता. रॉबिन्सनने त्याला क्लीन बोल्ड होऊन परत जाण्यास भाग पाडले. स्लिपमध्ये एका रेषेत बरेच फिल्डर लावले असल्याचे आपण बरेच वेळा पाहिले होते, पण ख्वाजासाठी स्टोक्सने समोरच्या बाजूला फिल्डिंग लावली आणि त्याला बाद केले.

एजबॅस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजाने 126 धावांच्या नाबाद धावसंख्येच्या पुढे खेळताना 141 धावांपर्यंत मजल मारली. दीडशे धावांच्या दिशेने जाणाऱ्या या फलंदाजासाठी इंग्लिश कर्णधाराने अनोखी फिल्डिंग सेट केली. डावाच्या 113व्या षटकात ओली रॉबिन्सन गोलंदाजीसाठी आला. स्टोक्सने ख्वाजाविरुद्ध शॉर्ट कव्हरपासून शॉर्ट लेगपर्यंत 6 खेळाडूंना स्थान दिले. एकाच वेळी इतके सारे खेळाडू डोळ्यांसमोर पाहून ख्वाजाही काहीतरी वेगळे करायला निघाला. रॉबिन्सनने मात्र तोच डाव साधला आणि तो बाद क्लीन बोल्ड झाला.

टॅग्स :बेन स्टोक्सआॅस्ट्रेलियाइंग्लंड
Open in App