Join us  

Ashes, AUS vs ENG, 1st Test : विकेट वाचवण्यासाठी डेव्हिड वॉर्नर अक्षरशः लोळला, बघा मजेशीर Video; बेन स्टोक्समुळे पहिल्या कसोटीत मोठा वाद

Ashes, AUS vs ENG, 1st Test : अ‍ॅशेस मालिकेतील ( Ashes Series) पहिल्या कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला असला तरी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 10:32 AM

Open in App

Ashes, AUS vs ENG, 1st Test : अ‍ॅशेस मालिकेतील ( Ashes Series) पहिल्या कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला असला तरी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. इंग्लंडचा पहिला डाव १४७ धावांवर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या दिवशी आघाडी मिळवली. पण, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापासून एका वादाला सुरुवात झाली. या वादात बेन स्टोक्स ( Ben Stokes) याचे नाव असल्यानं तो अधिक तीव्र झाला. त्यात डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याच्यासोबत एक मजेशीर प्रसंग घडला.  

पॅट कमिन्सच्या ( Pat Cummins) नेतृत्वाखाली प्रथमच खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियानं पहिल्याच दिवशी इंग्लंडचा डाव १४७ धावांवर गुंडाळला. नाणेफेक जिंकून  इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स  व जोश हेझलवूड या आग ओकणाऱ्या गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. स्टार्कनं दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर भन्नाट यॉर्कर टाकून रोरी बर्न्सचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पॅट कमिन्स व हेझलवूड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत इंग्लंडचा निम्मा संघ ६० धावांवर माघारी पाठवला. ओली पोप व जोस बटलर यांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पॅट कमिन्सनं १३.१ षटकांत ३८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. हेझलवूड व स्टार्क यांनी अनुक्रमे दोन विकेट्स घेतल्या, तर कॅमेरून ग्रीननं पहिली कसोटी विकेट घेतली.  

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्कस हॅरीस ( ३) याला ऑली रॉबिन्सननं माघारी पाठवले. पण , डेव्हिड वॉर्नर व मार्नस  लाबुशेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी केली. लाबुशेन ७४ धावांवर माघारी परतला. यावेळी वॉर्नरही बाद झाला असता, परंतु हसीब हमीदनं रन आऊट करण्याची सोपी संधी गमावली. 

दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात तांत्रिक चुकीमुळे मोठा वाद निर्माण झाला.  बेन स्टोक्सनं पहिल्या सत्रात एकूण १४ नो बॉल फेकले ,परंतु त्यापैकी १च मैदानावरील पंचांनी दिला. नो बॉलवर आता तिसऱ्या पंचाची नजर असतानाही झालेल्या या चुकीमुळे संताप व्यक्त केला जात आहे. जो नो बॉल पकडला गेला, तोही वॉर्नरनं मैदानावरील पंचांनी बाद दिल्यानंतर घेतलेल्या DRS मुळे समोर आला.  

टॅग्स :अ‍ॅशेस 2019आॅस्ट्रेलियाइंग्लंडडेव्हिड वॉर्नरबेन स्टोक्स
Open in App