Australia win by 275 runs and go 2-0 up in Ashes 2021-22 : ऑस्ट्रेलियानं डे-नाईट कसोटीतील अपराजित मालिका कायम राखताना अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर २७५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी ४६९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांवर गडगडला. झाय रिचर्डसननं कसोटीत प्रथमच डावात ( ५-४२) पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. या सामन्यात जवळपास ३४ षटकं खेळून काढणाऱ्या जोस बटलरची दुर्दैवी विकेट ही इंग्लंडच्या अखेरच्या आशेला सुरूंग देणारी ठरली.
या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले. चौथ्या दिवशी दुसऱ्याच षटकात सलामीवीर हासीब हमीद (०) याला भोपळाही फोडू न देता कांगारूंनी इंग्लंडला इशारा दिला. पहिल्या डावात इंग्लंडसाठी दमदार फलंदाजी केलेल्या डेव्हिड मलानने रोरी बर्न्ससोबत ४४ धावांची भागीदारी करीत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कांगारूंनी इंग्लंडला ठरावीक अंतराने धक्के देत त्यांच्या फलंदाजीला सुरुंग लावला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रमुख फलंदाज जो रुटही (२४) चांगल्याप्रकारे स्थिरावल्यानंतर बाद झाल्याने इंग्लंडची वाट बिकट झाली आहे. इंग्लंडने ३४ धावांमध्ये मलान, बर्न्स आणि रुट हे तीन प्रमुख फलंदाज गमावल्याने त्यांची दिवसअखेर ४ बाद ८२ धावा अशी अवस्था झाली होती.
पाचव्या दिवशी ऑली पोप ( ४) व बेन स्टोक्स ( १२) यांना माघारी पाठवून ऑस्ट्रेलियानं विजयाच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलं. जोस बटलर व ख्रिस वोक्स हे खिंड लढवत होते. वोक्सनं ९७ चेंडूत ४४ धावा केल्या. ऑली रॉबिन्सनं ( ८) धावांवर बाद झाला. बटलर खेळपट्टीवर असताना इंग्लंडला २३ षटकं खेळून काढायच्या होत्या. पण, ३४ षटकं खेळून काढणारा बटलर दुर्दैवीरित्या बाद झाला. झाय रिचर्डसननं टाकलेला चेंडू बटलरनं सुरेख पद्धतीनं डिफेन्स केला, परंतु त्याचा पाय यष्टिंवर आदळला अन् त्याला हिट विकेट होऊन माघारी परतावे लागले. बटलरनं २०७ चेंडूंचा सामना करताना २६ धावा केल्या. इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांवर गुंडाळून ऑस्ट्रेलियानं हा सामना २७५ धावांनी जिंकला आणि मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.