Ashes, AUS vs ENG : अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली. कोरोना संक्रमित व्यक्तिच्या संपर्कात आल्यामुळे पॅट कमिन्सला आजच्या सामन्याला मुकावे लागले आणि स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आले. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, स्टुअर्ट ब्रॉडनं ८व्या षटकात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का देताना मार्कस हॅरिसला ( ३) माघारी पाठवले. पण, त्यानंतर डेव्हिड वॉर्नर व मार्नस लाबुशेन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. पण, या सामन्यात वॉर्नरच्या डोळ्यांत निराशेचे अश्रू पाहायला मिळाले, परंतु पॅव्हेलियनमध्ये जाताना त्यानं जी कृती केली त्यामुळे सर्वांचे मन जिंकले.
१ बाद ४ अशा अवस्थेत वॉर्नर व लाबुशेन ही जोडी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर उभी राहिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी केली. वॉर्नरनं १६७ चेंडूंत ११ चौकारांसह ९५ धावांची खेळी केली. बेन स्टोक्सनं त्याची विकेट काढली. सलग दुसऱ्या कसोटीत शतकाच्या उंबरठ्यावरून माघारी जावं लागल्यानं वॉर्नर रडवेला झाला. पण, त्यानं त्याच्या भावनांना आवर घातली. पेव्हेलियनमध्ये परत जात असताना त्यानं त्याची ग्लोव्हज लहान मुलाला भेट दिले आणि त्याची ही कृती सर्वांची मनं जिंकणारी ठरली.
रिषभ पंतनंतर कसोटी मालिकेत सलग दुसऱ्या सामन्यात शतकापासून वंचित रहावे लागणारा वॉर्नर हा दुसरा फलंदाज ठरला. रिषभ २०१८मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत ९२ व ९२ अशा धावांवर माघारी परतला होता. वॉर्नर या मालिकेत पहिल्या सामन्यात ९४ धावांवर बाद झाला, तर आज तो ९५ धावांवर माघारी परतला.
पाहा व्हिडीओ...