ashes eng vs aus 2023 : आजपासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्याला सुरूवात झाली आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला खराब सुरूवातीचा सामना करावा लागला. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने कांगारूची डोकेदुखी वाढली. डेव्हिड वॉर्नर (४), उस्मान ख्वाजा (१३), मार्नस लाबूशेन (२१) आणि स्टीव्ह स्मिथ (२२) धावांवर बाद झाला. पण मिचेल मार्शने एकट्याने किल्ला लढवत यजमानांना घाम फोडला. ११८ चेंडूत ११८ धावांची शतकी खेळी करून मिचेल मार्शने डाव सावरला.
१७ चौकार अन् ४ षटकार ठोकून मार्श बाद झाला. मार्शचे वादळ रोखण्यात ख्रिस वोक्सला यश आले. आघाडीचे चार फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर कांगारूचा संघ अडचणीत होता. पण मिचेल मार्शने ट्रॅव्हिस हेडच्या सोबतीने इंग्लिश गोलंदाजांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. मार्श बाद झाला असला तरी हेड खेळपट्टीवर टिकून आहे.
भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने मिचेल मार्शच्या या स्फोटक खेळीचे कौतुक केले. मार्शने समोरून आक्रमक खेळ केला असं म्हणत सेहवागने ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या शतकी खेळीला दाद दिली. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले, तर मार्क वुडला एक बळी घेण्यात यश आले.