ashes eng vs aus 2023 : कालपासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्याला सुरूवात झाली आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला खराब सुरूवातीचा सामना करावा लागला. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने कांगारूंची डोकेदुखी वाढली. डेव्हिड वॉर्नर (४), उस्मान ख्वाजा (१३), मार्नस लाबूशेन (२१) आणि स्टीव्ह स्मिथ (२२) धावांवर बाद झाला. पण मिचेल मार्शने एकट्याने किल्ला लढवत यजमानांना घाम फोडला. ११८ चेंडूत ११८ धावांची शतकी खेळी करून मिचेल मार्शने डाव सावरला. मार्शशिवाय ट्रॅव्हिड हेडने (३९) धावांची खेळी करून डाव सन्मानजक धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात ६०.४ षटकांत सर्वबाद २६३ धावा केल्या.
दरम्यान, कांगारूच्या संघाने २६३ धावा उभारल्यानंतर इंग्लिश संघाने सावध खेळी करत आपल्या डावाची सुरूवात केली. पण डावाच्या चौथ्याच षटकात यजमानांना बेन डकेटच्या (२) रूपात मोठा झटका बसला. तर सलामीवीर जक क्रॉली (३९) धावा करून तंबूत परतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर कोणत्याच इंग्लिश फलंदाजाचा टिकाव लागत नव्हता. पण कर्णधार बेन स्टोक्सने एकट्याने किल्ला लढवत ८० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. खरं तर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 'कर्णधार विरूद्ध कर्णधार' असा सामना पाहायला मिळाला. एकीकडे स्टोक्सने मोठी खेळी केली तर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने ६ बळी घेत यजमानांना धक्के दिले.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ६ बळी घेतले. तर मिचेल स्टार्क (२) आणि मिचेल मार्श आणि टोड मर्फी यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. कमिन्सने शानदार गोलंदाजी करताना १८ षटकांत ९१ धावा देत ६ जणांना बाहेरचा रस्ता दाखवला. कमिन्सच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे इंग्लंडची कोंडी झाल्याचे दिसते. इंग्लिश संघ आपल्या पहिल्या डावात ५२.३ षटकांत सर्वबाद २३७ धावा करू शकला अन् ३६ धावांनी पिछाडीवर राहिला.