Ashes, ENG vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेतील दुसरी कसोटी ४३ धावांनी जिंकून इंग्लंडविरुद्ध २-० अशी आघाडी घेतली. लॉर्ड्सवर झालेला हा सामना मैदानावरील चुरशीसोबतच मैदानाबाहेरील भांडणांनीही गाजला. स्टीव्ह स्मिथने टिपलेला वादग्रस्त झेल, ऑसी यष्टिरक्षक ॲलेक्स केरीने इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोला केलेले रन आऊट यामुळे इंग्लंडचे समर्थक प्रचंड संतापले होते. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने १५५ धावांची वादळी खेळी करून उत्तर दिले, परंतु तो विजय मिळवून देऊ शकला नाही. याचा राग समर्थकांनी काढला... ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पाचव्या दिवळी लॉर्ड्सच्या लाँग रूमच्या दिशेने जात असताना काही समर्थकांनी ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांना धक्काबुक्की केली आणि शिवीगाळही केली. त्यामुळे वातावरण तापले होते. ख्वाजा व वॉर्नर दोघंही त्या समर्थकांवर धावून गेले होते, सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले. दरम्यान, खेळाडूंना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या ३ समर्थकांचे सदस्यत्व लॉर्ड्सने रद्द केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांच्या प्रत्त्युरात इंग्लंडने ३२५ धावा केल्या. पण, दुसऱ्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २७९ धावांत गुंडाळला. ३७१ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मैदानावर उतरलेल्या इंग्लंडला मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स व जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत धक्के दिले. इंग्लंडकडून बेन डकेट ( ८३) याने चांगली खेळी केली होती, परंतु अन्य फलंदाज पटापट माघारी परतले. संघ संकटात असताना कर्णधार स्टोक्सचे वादळ लॉर्ड्सवर घोंगावले अन् त्याने ९ चौकार व ९ षटकारांसह १५५ धावांची खेळी केली. त्याच्या फटकेबाजीने इंग्लंडच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, परंतु त्याची विकेट पडली अन् ऑस्ट्रेलियाने पटापट विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा दुसरा डाव ३२७ धावांवर गुंडाळून ऑस्ट्रेलियाने ४३ धावांनी मॅच जिंकली.