Ashes ENG vs AUS 3rd Test : ॲशेस मालिकेच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस मिचेल मार्श आणि मार्क वूड यांनी गाजवला... ४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या मार्शने ११८ धावांची खेळी करून डाव सारवला, तेच इंग्लंडच्या संघात पुनरागमन करणाऱ्या मार्क वूडने वेगवान मारा करून ५ विकेट्स घेतल्या. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी १३ विकेट्स पडल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडने ३ गडी गमावत ६८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक ॲलेक्स करी पुन्हा चर्चेत आला आणि यावेळी त्याची समयसुचकता चर्चेत राहिली.
लॉर्ड्स कसोटीत ॲलेक्सने ज्या पद्धतीने जॉनी बेअरस्टोची विकेट मिळवली होती, त्यावरून प्रचंड वाद झाला होता. पण, आज त्याच ॲलेक्सचे कौतुक होतंय... इंग्लंडचा फॉर्मात असलेला सलामीवीर बेन डकेट याचा अप्रतिम झेल ॲलेक्सने टिपला.. पॅट कमिन्सच्या चेंडूने डकेटच्या बॅटची किनार घेतली... पहिल्या स्लीपच्या दिशेने जाणारा चेंडू टिपण्यासाठी ॲलेक्सने झेप घेतली अन् चेंडू पकडला, परंतु तो खाली पडू न देण्यासाठी त्याने नाक व हनुवटीचा आधार घेतला.. त्याने घेतलेला झेल पाहून हसूही येत होते, परंतु कौतुकही झाले.
प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला मार्क वूडने धक्के दिले. उस्मान ख्वाजा ( १३) , ॲलेक्स केरी ( ८), मिचेल स्टार्क ( २) , पॅट कमिन्स ( ०) आणि टोड मर्फी ( १३) या पाच विकेट्स वूडने ३४ धावा देत घेतल्या. मार्शने ११८ चेंडूंत १७ चौकार व ४ षटकारांसह ११८ धावा केल्या. त्यानंतर ट्रॅव्हिस हेड ( ३९) हा ऑसींकडून सर्वोत्तम धावा करणारा फलंदाज ठरला. १०० वी कसोटी खेळणारा स्टीव्ह स्मिथ २२ धावांवर बाद झाला. ख्रिस वोक्स ( ३-७३) व स्टुअर्ट ब्रॉड ( २-५८) या जोडीने उर्वरित पाच विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ६८ धावांत ३ फलंदाज गमावले. पॅट कमिन्सने दोन विकेट्स घेतल्या, तर मार्शने इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅवली ( ३३) ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली.