Ashes, ENG vs AUS: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे अँशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याआधी मालिकेत ३-०ने मागे असलेल्या इंग्लंडसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून व्हॉईटवॉशच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याच्या विचारात आहे. या सामन्यात आज तिसऱ्या दिवसाच्या खेळात लंच टाईमनंतर एक विचित्र घटना घडली. या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली. मैदानावरही या घटनेने अनेकांना आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावली.
लंच टाईमनंतर इंग्लंडचा संघ फलंदाजी करत होता. ३०व्या षटकात पहिलाच चेंडू बेन स्टोक्सने सोडून दिला. चेंडू स्टोक्सच्या पॅडला लागून गेल्याचा अंदाज बांधत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अपील केलं आणि पंच पॉल राफेल यांनीही अपीलनंतर स्टोक्सला बाद ठरवले. स्टोक्सला मात्र हा निर्णय मान्य नव्हता त्यामुळे त्याने DRSची मदत घेतली. रिप्ले मध्ये जे दिसलं ते पाहून सारेच अवाक् झाले. चेंडू बॅट किंवा पॅडला लागला नव्हता. खरं तर चेंडू हा थेट स्टंपवर जाऊन आपटला होता. पण बेल्स स्टंपवरून खाली पडलीच नाही आणि त्यामुळे स्टोक्स थोडक्यात बचावला.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न त्यावेळी समालोचन करत होता. तोदेखील हा प्रकार पाहून आश्चर्यचकित झाला. अशा प्रकारच्या खेळात पंचांनी फलंदाजाला आऊट कसं काय दिलं होतं.. असा प्रकार मी आधी कधीच पाहिला नव्हता, असं शेन वॉर्न म्हणाला. तर, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका नव्या चर्चेला सुरूवात केली. अशा प्रकारच्या घटनांसाठी हिटींग द स्टंप्स नावाचा नवा नियम आणायला हवा का?, चाहत्यांनो तुम्हाला काय वाटतं? आपण गोलंदाजांचाही विचार करायला हवा, असं ट्वीट त्याने केलं.