Ashes ENG vs AUS : स्टीव्ह स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत ४१६ धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडचा संघ बॅझबॉल खेळ विसरून बचावात्मक खेळ करतील अशी आशा होती, परंतु ती फोल ठरली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सापळा रचून इंग्लंडचा पहिला डाव ३२५ धावांत गुंडाळून ९१धावांची आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४१६ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर यजमान इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद २७८ धावांपर्यंत मजल मारली होती. झॅक क्रॅवली ( ४८), बेन डकेट ( ९८), ऑली पोप ( ४२) यांनी चांगली सुरूवात करून दिली होती. पण, तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या अन्य फलंदाजांनी तंबूत परण्याची शर्यत लावली. कर्णधार बेन स्टोक्स ( १७) पुन्हा अपयशी ठरला. मिचेल स्टार्कने त्याला अप्रतिम चेंडूवर झेलबाद केले. हॅरी ब्रूकने अर्धशतकी खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही स्टार्कने माघारी पाठवले.
बघता बघता इंग्लंडचे ६ फलंदाज केवळ ४८ धावांत आज माघारी परतले. १ बाद १८८ वरून इंग्लंडचा संपूर्ण संघ ३२५ धावांवर गडगडला. त्यांचे ९ फलंदाज १३७ धावांत बाद झाले. मिचेल स्टार्कने ३, जोश हेझलवूड व ट्रॅव्हिस हेड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. नॅथन लाएन दुखापतीमुळे आज खेळू शकला नाही.
दरम्यान, फॅब फोर खेळाडूंमध्ये स्मिथच्या नावावर सर्वाधिक ३२ कसोटी शतकं झाली आहेत.. त्यानंतर जो रूट ( ३०), केन विलियम्सन ( २८) व विराट कोहली ( २८) यांचा क्रमांक येतो. इंग्लंडमध्ये पाहुण्या फलंदाजानी झळाकवल्या सर्वाधिक कसोटी शतकवीरांमध्ये स्मिथने ( ८) दुसरे स्थान पटकावताना स्टीव्ह वॉ ( ७) चा विक्रम मोडला. सर डॉन ब्रॅडमन यांनी ११ शतकं झळकावली आहेत. राहुल द्रविडच्या नावावर ६ शतकं आहेत.
स्मिथने ३२वे ( १७४ इनिंग्ज) शतक झळकावून ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांत दुसरे स्थान पटकावले. रिकी पाँटिंग ४१ शतकांसह ( २८७ इनिंग्ज) अव्वल स्थानी आहे. पहिल्या १०० कसोटीमध्ये सर्वाधिक ३२ शतकं झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, मॅथ्यू हेडन यांनी त्यांच्या पहिल्या १०० कसोटींत प्रत्येकी ३० शतकं झळकावली होती. इंग्लंडच्या खेळपट्टीवर कसोटीत २०००+ धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला. डॉन ब्रॅडमन ( २६७४), अॅलेन बॉर्डर ( २०८२) व व्हिव्ह रिचर्ड्स ( २०५७) यांनी हा पराक्रम केलाय.
Web Title: Ashes ENG vs AUS : England losing six wickets for 47 runs, as Australia claim a valuable 91 runs first-innings lead, england all out in 325
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.