Ashes, ENG vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या तीनही कसोटीत एकतर्फी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर चौथ्या कसोटीत इंग्लंडकडून झुंज पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ८ बाद ४१६ धावांवर डाव घोषित केला. उस्मान ख्वाजाने ठोकलेल्या १३७ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली. याला प्रत्युत्तरास इंग्लंडची अवस्था ४ बाद ३६ होती. पण बेन स्टोक्सचं अर्धशतक आणि जॉनी बेअरस्टोचं दमदार नाबाद शतक यांच्या जोरावर इंग्लंडने द्विशतकी मजल मारली. महत्त्वाची बाब म्हणजे, यंदाच्या अँशेस मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजाने लगावलेले हे पहिलेच शतक ठरले. पहिल्या तीनही सामन्यात एकाही इंग्लिश फलंदाजाला शतक ठोकता आलं नव्हतं. त्याच्या शतकी खेळीमुळेच तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ७ बाद २५८ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने ४०० पार मजल मारल्यानंतर इंग्लंडकडून चांगल्या प्रतिकाराची अपेक्षा होती. पण हसीब हमीद (६), जॅक क्रॉली (१८), डेव्हिड मलान (३), जो रूट (०) आणि जोस बटलर (०) या पाच फलंदाजांनी पूर्णपणे निराशा केली. बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो या जोडीने सुमारे १३० धावांची भागीदारी करून इंग्लंडचा डाव रुळावर आणला. बेन स्टोक्स अर्धशतक करून ६६ धावांवर बाज झाला. त्यानंतर मार्क वूडने चांगली सुरूवात केली होती पण तो ३९ धावांवर माघारी परतला. पण जॉनी बेअरस्टोने मात्र दिवस संपेपर्यंत संघर्ष करत शतक ठोकलं. १४० चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकार खेचत त्याने नाबाद १०३ धावा केल्या. महत्त्वाचं म्हणजे, इंग्लंडच्या संघाकडून पहिल्या तीनही सामन्यात एकालाही शतक ठोकता आलेलं नव्हतं. पण या सामन्यात अखेर त्यांना एक शतकवीर मिळाला.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा संघ १५८ धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे बेअरस्टोपुढे तळाच्या फलंदाजांना साथीला घेऊन शक्य तितक्या धावा करण्याचे आव्हान आहे. पॅट कमिन्स, स्कॉट बोलंड, मिचेल स्टार्क, कॅमेरॉन ग्रीन आणि नॅथन लायन या ऑस्ट्रेलियन गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांचा कितपत निभाव लागतो हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.