Stuart Broad On Yuvraj Singh : सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ॲशेस कसोटी मालिकेतील अखेरचा अर्थात पाचवा सामना खेळवला जात आहे. लंडनमध्ये होत असलेल्या या सामन्याकडे क्रिकेट वर्तुळाच्या नजरा लागून आहेत. लक्षणीय बाब म्हणजे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. निवृत्ती जाहीर करताना ब्रॉडने त्याच्या कारकिर्दीतील अनेक बाबींवर भाष्य केले. तसेच त्याने २००७ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकाबद्दल बोलताना युवराज सिंगने मारलेल्या सहा षटकारांचा उल्लेख केला. युवराजच्या वादळी खेळीवर ब्रॉडचं भाष्य २००७ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकात भारताचा माजी खेळाडू युवराज सिंगने इंग्लंडविरूद्ध वादळी खेळी केली होती. ब्रॉडच्या एकाच षटकात सहा षटकार ठोकून युवीने इतिहास रचला. याबद्दल बोलताना ब्रॉडने म्हटले, "२००७ मध्ये भारतीय फलंदाज युवराज सिंगने माझ्या ६ चेंडूत ६ षटकार मारले होते. पण, त्या एका षटकाने मला एक चांगला क्रिकेटर बनण्यास मदत केली. त्या षटकानंतर मी क्रिकेटर म्हणून आणखी चांगली कामगिरी केली. मी आज जो आहे त्यात त्या ६ चेंडूंचा मोठा वाटा आहे." खरं तर त्यावेळी स्टुअर्ट ब्रॉड त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात होता.
२००६ मध्ये इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे शनिवारी जाहीर केले. युवीने २००७ च्या विश्वचषकात ब्रॉडला सहा षटकार ठोकले तेव्हा इंग्लिश गोलंदाज प्रसिद्धीच्या झोतात आला होता. ब्रॉडची कारकिर्दइंग्लिश संघाच्या कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून ब्रॉडकडे पाहिले जाते. कसोटी सामन्यांव्यतिरिक्त स्टुअर्ट ब्रॉडने इंग्लंडकडून वन डे आणि ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. मात्र, ब्रॉड कसोटी क्रिकेटपटू म्हणून खूप यशस्वी ठरला. ब्रॉडने १६७ कसोटी सामन्यांमध्ये ६०२ बळी घेतले आहेत. तर, वन डेमधील १२१ सामन्यांमध्ये १७८ आणि ट्वेंटी-२० मधील ५६ सामन्यांमध्ये ६५ बळी घेण्यात इंग्लिश गोलंदाजाला यश आले.