लंडन : मिशेल स्टार्क, ट्रॅविस हेड, जोश हेझलवूड यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे इंग्लंडची पहिल्या डावात ४ बाद २७९ धावांवरून सर्वबाद ३२५ धावा अशी घसरगुंडी उडाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेर २ बाद १३० धावा करत लाॅर्डस् येथे सुरू असलेल्या ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात वर्चस्व राखले. ऑस्ट्रेलिया एकूण २२१ धावांनी आघाडीवर आहे.
४ बाद २७८ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यानंतर तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्सला (१७) बाद करत स्टोक्सने ही जोडी फोडली. त्यानंतर हॅरी ब्रूकही (५०) अर्धशतक केल्यानंतर बाद झाला. जाॅनी बेअरस्टो (१६), स्टुअर्ट ब्राॅड (१२) यांनी संघाला ३००चा टप्पा गाठून दिला. मात्र, दोघेही बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला. इंग्लंडने ४६ धावांत ६ फलंदाज गमावले. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने तीन, जोश हेझलवूड आणि ट्रॅविस हेड यांनी प्रत्येकी दोन, तर पॅट कमिन्स, नॅथन लायन, कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
यानंतर ९१ धावांची आघाडी घेतलेल्या कांगारुंना उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वाॅर्नर यांनी ६३ धावांची सलामी दिली. टंगने वाॅर्नरला पायचीत करत ही जोडी फोडली. वाॅर्नरने २५ धावा केल्या. मार्नस लाबुशने पुन्हा एकदा चांगल्या स्थितीत असताना बाद झाला. त्याने ५१ चेंडूंत ५ चौकारांसह ३० धावा केल्या. उस्मान ख्वाजाने शानदार अर्धशतक झळकावताना १२३ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ५८ धावा केल्या. त्याला साथ देणारा स्टीव्ह स्मिथ २४ चेंडूंत नाबाद ६ धावांवर खेळत आहे. पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला.
धावफलक ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १००.४ षटकांत सर्वबाद ४१६.इंग्लंड (पहिला डाव) : झॅक क्राॅली यष्टिचीत कॅरी गो. लायन ४८, बेन डकेट झे. वाॅर्नर गो. हेझलवूड ९८, ओली पोप झे. स्मिथ गो. ग्रीन ४२, जो रूट झे. स्मिथ गो. स्टार्क १०, हॅरी ब्रुक झे. कमिन्स गो. स्टार्क ५०, बेन स्टोक्स झे. ग्रीन गो. स्टार्क १७, जाॅनी बेअरस्टो झे. कमिन्स गो. हेझलवूड १६, स्टुअर्ट ब्राॅड पायचीत गो. हेड १२, ओली राॅबिन्सन झे. कॅरी गो. हेड ९, जोश टंग झे. रेनशाॅ गो. कमिन्स १, जेम्स अँडरसन नाबाद ०. अवांतर २२. एकूण ७६.२ षटकांत सर्वबाद ३२५.बाद क्रम : १-९१, २-१८८, ३-२०८, ४-२२२, ५-२७९, ६-२९३, ७-३११, ८-३२४, ९-३२५, १०-३२५. गोलंदाजी : मिशेल स्टार्क १७-०-८८-३, पॅट कमिन्स १६.२-२-४६-१, जोश हेझलवूड १३-१-७१-२, नॅथन लायन १३-१-३५-१, कॅमेरून ग्रीन ९-०-५४-१, ट्रॅविस हेड ७-१-१७-२, स्टिव्हन स्मिथ १-०-१-०.ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : उस्मान ख्वाजा खेळत आहे ५८, डेव्हिड वाॅर्नर पायचीत गो. टंग २५, मार्नस लाबुशेन झे. ब्रूक गो. अँडरसन ३०, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे ६. अवांतर: ११. एकूण ४५.४ षटकांत २ बाद १३०. बाद क्रम १-६३, २-१२३. गोलंदाजी : जेम्स अँडरसन १४-३-४१-१, स्टुअर्ट ब्राॅड १३-४-३९-०, जोश टंग ९-२-२१-१, ओली राॅबिन्सन ९.४-५-१८-०.