Join us  

Ashes Test: इंग्लंडच्या फलंदाजांची १४७ धावांत शरणागती; कमिन्सची भेदकता, इंग्लंडचा खुर्दा! 

ज्यो रुटने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. मिशेल स्टार्कने पहिल्याच चेंडूवर बर्न्सचा त्रिफळा उडवून विक्रमी कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 6:47 AM

Open in App

ब्रिस्बेन : वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार या नात्याने प्रथमच पहिल्या डावात पाच गडी बाद करीत ॲशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लिश फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. इंग्लंडने केवळ १४७ धावा केल्या. यानंतर पावसाने हजेरी लावली. खराब हवामान व मैदान निसरडे झाल्याने तिसरे सत्र रद्द झाले. कमिन्सने ३८ धावांत अर्धा संघ गारद केला.

मिशेल स्टार्क व जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी दोन, तर अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने एक गडी बाद केला. चारच इंग्लिश फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. जोस बटलरने सर्वाधिक ३९, तर ओली पोपने ३५ धावा केल्या. इंग्लंड बाद होताच चहापान आटोपण्यात आले. नंतर खेळ झालाच नाही. दुसऱ्या दिवशी खेळ अर्धा तास आधी सुरू होणार आहे.

ज्यो रुटने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. मिशेल स्टार्कने पहिल्याच चेंडूवर बर्न्सचा त्रिफळा उडवून विक्रमी कामगिरी केली. ढगाळ वातावरण व खेळपट्टीवरील गवत पाहता रुटचा निर्णय चुकल्याचे जाणवले. बर्न्स या मोसमात सहाव्यांदा भोपळा न फोडता बाद झाला. हेजलवूडने डेव्हिड मलान (६) व कर्णधार रुट (०) यांना बाद करताच इंग्लंडने ६ षटकांत ११ धावांत ३ बळी गमावले. स्टोक्स बाद झाला त्यावेळी ४ बाद २९ अशी अवस्था झाली.

१३९ वर्षांत चौथ्यांदा!

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात पारंपरिक मानले जाणारे क्रिकेटयुद्ध ‘ॲशेस’ बुधवारी सुरू झाले. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पहिल्याच चेंडूवर मिशेल स्टार्कने सलामीवीर रोरी बर्न्सचा त्रिफळा उडवून सनसनाटी निर्माण केली. ॲशेसच्या १३९ वर्षांच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर बळी जाण्याची ही चौथी वेळ ठरली. १८८२ ला सुरू झालेल्या ॲशेसमध्ये १९३६ पर्यंत तीन वेळा असा प्रसंग घडला होता. आज ८५ वर्षांनंतर पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होताच रोमहर्षक सुरुवात अनुभवायला मिळाली.

पहिल्या चेंडूवर बाद झालेले फलंदाजए. सी. मॅक्लारेन (इंग्लंड) ऑस्ट्रेलियाविरुद्ध, मेलबोर्न १८९४, गोलंदाज- आर्थर कॉनिंगम वॉरेन बार्डस्ले (ऑस्ट्रेलिया) इंग्लंडविरुद्ध, लीड्स १९२६, गोलंदाज- मॉरिस टैट स्टान वॉरिंग्टन (इंग्लंड) ऑस्ट्रेलियाविरुद्ध, ब्रिस्बेन १९३६, गोलंदाज - अर्नी मॅक्कार्मिक रोरी बर्न्स (इंग्लंड) ऑस्ट्रेलियाविरुद्ध, ब्रिस्बेन २०२१, गोलंदाज - मिशेल स्टार्क

इंग्लंड :  बर्न्स त्रि. गो. स्टार्क ०, हमीद झे. स्मिथ गो. कमिन्स २५, मलान झे. केरी गो. हेजलवूड ६, रूट झे. वॉर्नर गो. हेजलवूड ०, स्टोक्स झे. लाबुशेन गो. कमिन्स ५, पोप झे. हेजलवूड गो. ग्रीन ३५, बटलर झे. केरी गो. स्टार्क ३९, व्होक्स झे. हेजलवूड गो. कमिन्स २१, रॉबिन्सन झे. केरी गो. कमिन्स ०, वूड झे. हॅरिस गो. कमिन्स ८, जॅक लीच नाबाद २, अवांतर : ६. एकूण : ५०.१ षटकांत सर्वबाद १४७. गोलंदाजी : स्टार्क ३५-२, हेजलवूड ४२-२, कमिन्स ३८-५, लियोन २१-०, ग्रीन ६-१. 

टॅग्स :इंग्लंडआॅस्ट्रेलिया
Open in App