प्रवीण साठे : भारतीय क्रिकेट संघाचा माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहरा सध्या ‘फनटाइम’ मूडमध्ये आहे. गोव्यातील काही दिवसांचा मुक्काम आटोपून ‘नेहराजी’ची स्वारी सिंधुदुर्ग जिल्ह्यााकडे वळली. वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे या निवांत बीचवर नेहराने जलसफरीचा आनंद लुटला. स्थानिक जीवरक्षकांना सोबत घेत आशिषने जलसफर केली. काही दिवसांपूर्वी नेहरा हा गोव्यामध्ये आपल्या कुटुंबियांसमवेत राहायला आला होता. त्यानंतर आज पहिल्यांदाच नेहरा हा सिंधुदुर्गामध्ये दाखल झाल्याचे म्हटले जात आहे.
दिल्लीतील प्रदूषणाला कंटाळून नेहरा निसर्गाच्या सान्निध्यात आपला वेळ खर्च करण्यावर भर देत आहे. गोव्यातही त्याने आठवडाभर मुक्काम केला होता. मात्र, त्याचा हा दौरा पूर्णत: गुप्त होता. त्याच्या पत्नीने मुलांसोबत ‘फनटाइम’मध्ये व्यस्त असल्याचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला होता. हा फोटो व्हायरल झाला होता.
नेहराने यापूर्वी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत प्रचंड चिंता व्यक्त केली होती. त्यामुळेच त्याने गोव्यात बंगलाही भाड्याने घेतला आहे. या ठिकाणी मुक्काम केल्यावर त्याने पर्यटनासाठी सिंधुदुर्गातील भोगवे बीचची निवड केली. या बीचवर पर्यटकांची वर्दळ तशी कमीच असते, त्यामुळे त्याने निवांतपणे पर्यटनाचा आनंद लुटला. हा बीच निसर्गरम्य असून या ठिकाणी एक सेव्हन स्टार हॉटेलही आहे. बरेच सेलिब्रिटी याची निवड करतात. काही दिवसांपूर्वी जागतिक ख्यातीचे संगीतकार ए. आर. रेहमान आणि प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनीसुद्धा या ठिकाणी वेळ घालवला होता. पण त्यांचा हा दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. भारताचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक सुनील गावसकर हे वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा गावाचे सुपुत्र आहेत. ज्या ज्या वेळी ते सिंधुदुर्गला भेट देतात, त्यावेळी पर्यटनासाठी ते भोगवे बीचची निवड करतात, असे येथील स्थानिकांनी सांगितले.
नेहरानेसुद्धा आपला दौरा गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु सोशल मीडियावर त्याचा फोटो व्हायरल झाल्यामुळे नेहराजी सिंधुदुर्गात असल्याची बातमी सर्वत्र पसरली. काहींनी त्याला भेटण्याचा प्रयत्नही केला. परंतु, काही मोजक्याच चाहत्यांनी त्याची छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपली.