Ashish Nehra, IPL Auction 2025: आगामी हंगामासाठी नुकताच लिलाव पार पडला. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत प्रत्येक संघाने आपल्या संघातील रिटेन केलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेले खेळाडू यांची यादी जाहीर केली. त्यानंतर करारमुक्त खेळाडूंचा २४ आणि २५ नोव्हेंबरला मेगालिलाव करण्यात आला. या लिलावात भारतीय यष्टिरक्षक रिषभ पंत याच्यावर आयपीएल इतिहासातील सर्वाधिक महागडी २७ कोटींची बोली लागली. त्याखालोखाल मुंबईकर श्रेयस अय्यरवर २६ कोटी ७५ लाखांची मोठी बोली लागली. याशिवाय, इतरही अनेक खेळाडूंवर मोठ्या बोली लावण्यात आल्या. अशा परिस्थितीत गुजरात टायटन्स संघाचा यशस्वी प्रशिक्षक आशिष नेहरा याने एक मोठा दावा केला. एका बड्या खेळाडूचे नाव घेत, त्या खेळाडूसाठी ५२० कोटींची बोलीही पुरेशी ठरली नसती, असे नेहरा म्हणाला.
“एक प्रतिभावान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहने स्वत:ला वेळोवेळी सिद्ध केले आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यात त्याने संघाचे नेतृत्व केले. नियमित कर्णधार नसताना नव्या हंगामी कर्णधारावर खूपच दडपण असते. पण बुमराहने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली, ते खरंच कौतुकास्पद आहे. न्यूझीलंडविरूद्ध आपल्या घरात ३-० ने पराभूत झालेल्या टीम इंडियाला त्याने अप्रतिम नवी सुरुवात करुन दिली. अशा खेळाडूची इतर कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. जर यंदाच्या लिलावात बुमराहवर बोली लावली गेली असती तर काहीही घडू शकले असते. कदाचित संघांची ५२० कोटींची रक्कमही बुमराहसाठी कमी पडली असती,” असा अतिशय मोठा दावा नेहराने केला.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला. पहिल्या डावात भारत १५० धावांत सर्वबाद झाला. त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघ वरचढ वाटत होता. पण बुमराहने ३० धावांत ५ बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव १०४ धावांतच गुंडाळला. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी धमाकेदार कामगिरी करत मोठी धावसंख्या उभारली. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे प्रयत्न तोकडे पडले. दुसऱ्या डावातही बुमराहने ३ बळी घेतले. त्यामुळे संपूर्ण सामन्यात ८ बळी टिपणाऱ्या कर्णधार जसप्रीत बुमराहला सामनावीर निवडण्यात आले.