ashish nehra news : ट्वेंटी-२० विश्वचषकासह राहुल द्रविड यांचा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. गौतम गंभीर आता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. सध्या भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून, तिथे ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळवली जाणार आहे. प्रशिक्षकपदासाठी इतरही काही माजी खेळाडू अर्ज करतील अशी चर्चा होती. यातीलच एक नाव म्हणजे आशिष नेहरा. पण, आता नेहराने अर्ज न करण्यामागील कारण सांगितले आहे.
गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने आयपीएल २०२४ चा किताब जिंकला. आशिष नेहरा गुजरात टायटन्सच्या संघाला मार्गदर्शन करतो. प्रशिक्षकपदासाठी अर्ज न केल्याबद्दल नेहराने सांगितले की, मी कधीच याचा विचार केला नव्हता. माझी मुलं अजून लहान आहेत. गौतम गंभीरच्या मुलीही लहानच आहेत, पण प्रत्येकाचा तो निर्णय असतो. त्यामुळे मी जिथे आहे तिथे खुश आहे. नऊ महिने संघासोबत प्रवास करण्याच्या मानसिकतेत मी नाही. नेहरा स्पोर्ट्स तकशी बोलत होता.
दरम्यान, शनिवारपासून श्रीलंका आणि भारत यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळेल. ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर भारताची युवा ब्रिगेड झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली होती. या मालिकेतून भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. पण, आता विराट, रोहित, हार्दिकसह सूर्यकुमार यांचे पुनरागमन झाले आहे. नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीरची ही पहिलीच परीक्षा असणार आहे.
भारताचा ट्वेंटी-२० संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक -पहिला सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.दुसरा सामना - २८ जुलै - संध्याकाळी ७ वा.तिसरा सामना - ३० जुलै - संध्याकाळी ७ वा.