महिलांच्या ॲशेस मालिकेतल्या एकमेव कसोटी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. विजयासाठी २६८ धावांचा पाठलाग करणारा इंग्लंडचा संघ १७८ धावांत तंबूत परतला अन् ऑस्ट्रेलियाने ८९ धावांनी बाजी मारली. ॲश गार्डनर ( ASHLEIGH GARDNER) या डावात ८ विकेट्स घेत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७३ धावांचा डोंगर उभा केला. एलिसे पेरी ( ९९), ॲनाबेल सदरलँड ( १३७), ताहलिया मॅग्राथ ( ६१) आणि ॲश्लेघ गार्डनर ( ४०) यांनी ऑस्ट्रेलियाकडून दमदार फलंदाजी केली. इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टनने १२९ धावांत ५ विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडूनही जबरदस्त पलटवार झाला अन् त्यांनी ४६३ धावांपर्यंत मजल मारून ऑसींना १० धावांचीच आघाडी घेऊ दिली. कर्णधार हिदर नाईट ( ५७), नॅथ श्विव्हर ब्रंट ( ७८) आणि डॅनी वॅट ( ४४) यांनी चांगला खेळ केला. पण, टॅमी बियूमोंट पराक्रम गाजवला.
ॲशेस मालिकेत द्विशतक करणारी ती इंग्लंडची पहिली महिला खेळाडू ठरली. तिने १९३५ साली इंग्लंडच्या बेट्टी स्नोवबॉलचा सर्वाधिक १८९ ( वि. न्यूझीलंड) धावांचा विक्रम मोडला. टॅमीने ३३१ चेंडूंत २७ चौकारांच्या मदतीने २०८ धावा केल्या आणि इंग्लंडकडून हा एखाद्या खेळाडूने केलेल्या सर्वोत्तम वैयक्तिक धावा ठरल्या. महिला कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी ती आठवी खेळाडू ठरली.
इंग्लंडने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला २५७ धावांवर गुंडाळलं. सोफीने ६३ धावांत ५ विकेट्स घेतल्या. एकाच कसोटीत १० विकेट्स घेणारी ती जगातील दहावी गोलंदाज ठरली. २६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवातच खराब झाली. डॅनी वॅट ( ५४) वगळता अन्य फलंदांनी गार्डनरच्या फिरकीसमोर शरणागती पत्करली. गार्डनरने २०-१-६६-८ अशी अप्रतिम स्पेल टाकली. पहिल्या डावात तिने ४ विकेट्स घेतल्या होत्या आणि ट्रेंट ब्रिज कसोटीत १२ विकेट्स घेणारी ती पहिली फिरकीपटू ठरली. यापूर्वी बिल ओ'रिलीने १२९ धावांत ११, मुथय्या मुरलीधरनने १३२ धावांत ११ विकेट्स घेतल्या होत्या.