नवी दिल्ली : भारताचा जलदगती गोलंदाज अशोक दिंडा याने क्रिकेटमधून निवृत्ती होत असल्याची घोषणा केली आहे. भारताकडून अशोक दिंडाने एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळले होते. अशोक दिंडाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचे आज (मंगळवारी) जाहीर केले.
क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना ३६ वर्षीय अशोक दिंडा याने सांगितले की, क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझे आई-वडिलांसह अनेकांनी माझे करिअर घडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. माझे मैदानावरील पालक सौरव गांगुली यांचे विशेष आभार मानतो. माझ्या करिअरमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे, अशा शब्दांत अशोक दिंडाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
अशोक दिंडाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
मे २०१० मध्ये झिम्बाव्वे विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत अशोक दिंडाने पहिला सामना खेळला होता. अशोक दिंडाने १३ एकदिवसीय सामन्यांत १२ विकेट्स घेतल्या होत्या. अशोक दिंडाने आपला पहिला टी-२० सामना सन २००९ मध्ये खेळला होता. एकूण टी-२० सामन्यांमध्ये त्याने १७ विकेट्स घेतल्या होत्या. सन २०१३ मध्ये अशोक दिंडाने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. सन २०१२ मध्ये दिंडाने शेवटचा टी-२० सामना खेळला होता.
अशोक दिंडाची फर्स्ट क्लास कारकीर्द
सन २००५ मध्ये अशोक दिंडाने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एकूण ११६ सामन्यांमध्ये ४२० विकेट्स त्याने घेतल्या. यामध्ये २६ वेळा एकाच सामन्यात पाच विकेट्स त्याने घेतल्या होत्या. याशिवाय आयपीएलमध्ये अशोक दिंडाने ७८ सामने खेळले होते. तसेच २०२१ मध्ये मुश्ताक अली ट्रॉफीसाठी अशोक दिंडा गोवा संघाकडून खेळला होता.