नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुरुवारी आपल्या क्रिकेट सल्लागार समितीच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचा या तीन सदस्यीय समितीत समावेश करण्यात आला आहे. खरं तर मल्होत्रा यांनी 7 कसोटी आणि 20 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि अलीकडेच भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले आहे. तर परांजपे यांनी भारतासाठी 4 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
दरम्यान, 11 वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी दोन कसोटी, 46 वनडे आणि 31 ट्वेंटी-20 सामने खेळलेल्या सुलक्षणा नाईक याही तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्य आहेत. लक्षणीय बाब म्हणजे सलक्षणा नाईक या आधीपासूनच या समितीच्या सदस्य आहेत. त्यांनी माजी अष्टपैलू खेळाडू मदन लाल, आर पी सिंग यांच्यासोबत काम पाहिले आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाने मागील महिन्यात चेतन शर्मा यांच्या नेतृत्वातील चार सदस्यीय राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली होती. त्यानंतर तीन सदस्यीय समिती अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांच्यावर सध्या राष्ट्रीय निवड समिती निवडण्याची मोठी जबाबदारी असेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"