Syed Mushtaq Ali Trophy 2023: सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धेत मंगळवारी रेल्वेच्या आशुतोष शर्माने विक्रमी अर्धशतक झळकावले आणि उपेंद्र यादवने नाबाद १०३ धावांची खेळी केली. रेल्वे संघाने या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर अरुणाचल प्रदेश संघाविरुद्ध २० षटकांत ५ बाद २४६ धावा उभ्या केल्या.
चार वर्षानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत परतलेल्या रेल्वेच्या फलंदाज आशुतोषने रांची येथे वादळी खेळी करून युवराज सिंगचा ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतकाचा विक्रम मोडला. युवराजने २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध १२ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते, परंतु आज आशुतोषने अरुणाचल प्रदेशविरुद्ध ११ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि सर्वात वेगवान फिफ्टीत भारतीय फलंदाजात युवीला मागे टाकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळच्या दिपेंद्र सिंग ऐरीने मंगोलियाविरुद्ध ९ चेंडूंत अर्धशतक झळकावून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता.
आशुतोष आज १६व्या षटकात फलंदाजीला आला आणि २५ वर्षीय खेळाडूने ८ षटकार व १ चौकार खेचले. कालच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत गुजरातच्या सौरव चौहानने १३ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. आज आशुतोषने या स्पर्धेत सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम नावावर केला. याच सामन्यात रेल्वेचा यष्टिरक्षक फलंदाज उपेंद्र यादवने ५१ चेंडूंत १०३ धावा केल्या. त्याने ९ षटकार व सहा चौकार खेचले.