मतीन खान
२०१३ पासून ते आजतागायत मायदेशात झालेल्या १५ मालिकांपैकी एकही मालिका भारताने गमावलेली नाही. हा एक मोठा विक्रम आहे. कुंबळे, हरभजनचा काळ संपल्यानंतर गेल्या दहा वर्षांत रविचंद्रन अश्विन हा भारताचा हुकमी एक्का ठरलेला आहे. त्याच्या भेदक फिरकीच्या जोरावरच भारताने मायदेशात अद्वितीय कामगिरी केली.
नागपूर कसोटी जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला होता, ‘खेळपट्टीच्या ज्या बाजूने चेंडू वळतो त्याच बाजूने गोलंदाजी करण्यासाठी माझ्या संघातल्या फिरकीपटूंमध्ये चढाओढ रंगत असते. एकीकडे अश्विन म्हणतो की, मी ४५० बळींच्या उंबरठ्यावर आहे, तर दुसरीकडे २५० बळींच्या जवळ आलेल्या जड्डूचा गोलंदाजी करण्याचा आग्रह असतो. कहर म्हणजे या दोघांच्या नंतर अक्षर माझ्याकडे येतो आणि म्हणतो की माझे चेंडू जास्त वळत आहेत, तू मलाच गोलंदाजी दे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की मायदेशातील खेळपट्ट्यांवर भारतीय फिरकीपटूंचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला असतो.’
भारतीय खेळपट्ट्या म्हणजे फिरकीसाठी नंदनवनच. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांतली आकडेवारी बघितली तर लक्षात येईल की इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज या संघांतील फलंदाज भारतीय खेळपट्ट्यांवर सपशेल अपयशी ठरले आहेत. २०१३ साली इंग्लंडविरुद्ध मायदेशात १-२ ने पराभूत झाल्यानंतर भारताने आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. अश्विनने भारतात एकूण ५२ कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये त्याने ३२० बळी घेतले असून यादरम्यान २५ वेळा पाचपेक्षा जास्त बळी घेण्याची कमालही अश्विनने केली आहे. तर सहा वेळा त्याने दहापेक्षा जास्त बळीसुद्धा घेतले. मायदेशात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अश्विनने आता पाचवे स्थान गाठले आहे. मुथय्या मुरलीधरन, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि अनिल कुंबळे हे अनुक्रमे पहिल्या ते चौथ्या स्थानी आहेत.
ही आकडेवारी बघितल्यावर लक्षात येईल की, भारतात अश्विनची फिरकी म्हणजे फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेली आहे. त्यामुळे आपण अपेक्षा केली पाहिजे की केवळ सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतच नाही तर यावर्षी मायदेशात होणाऱ्या विश्वचषकातही अश्विनने भारतीय संघाला चॅम्पियन करण्यात महत्त्वाचे योगदान द्यायला हवे. आपल्या जादुई फिरकीच्या जोरावर अश्विनने सध्या जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे; पण यामुळे तो हुरळून जात नाही तर गोलंदाजीत नवेनवे प्रयोग करून सतत फलंदाजांना हैराण करत राहतो.
हर घड़ी चश्मे खरीददार में रहने के लिए,कुछ हुनर चाहिए बाजार में रहने के लिए.