सेंच्युरियन पार्क - रवीचंद्रन अश्विन आणि इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 335 धावांवर आटोपला. भारताकडून रवीचंद्रन अश्विनने चार तर इशांत शर्माने 3 बळी टिपून यजमान संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. दक्षिण आफ्रिकेच्या डावात हाशिम आमला (82) व मार्कराम (94) यांनी उल्लेखनीय योगदान दिले.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवशीच्या 6 बाद 269 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर यजमानांचे तळाचे फलंदाज फार चमक दाखवू शकले नाहीत. शमीने केशव महाराज (18) ची विकेट काढत दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का दिला. त्यानंतर एक बाजू लावून धरणाऱ्या कर्णधार फाफ डू प्लेसिसने कागिसो रबाडासोबत 42 धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिलेला तीनशेपार पोहोचवले. या दरम्यान भारतीय क्षेत्ररक्षकांनीही गचाळ क्षेत्ररक्षण करत अनेक झेल सोडले त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव लांबण्यास मदत झाली. अखेर इशांत शर्माने कागिसो रबाडा (11) आणि डू प्लेसिस (63) यांना माघारी धाडले. तर अश्विनने डावातील चौथा बळी मिळवत दक्षिण आफ्रिकेचा डाव 335 धावांवर संपुष्टात आणला.तत्पूर्वी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी शेवटच्या तासात पाच धावांच्या अंतरात तीन बळी घेत भारताने दक्षिण आफ्रिकेला दिवसअखेर 6 बाद 269 धावांत रोखले होते.आज पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी कर्णधार फाफ डू प्लेसिस (२४) व केशव महाराज (१०) खेळपट्टीवर होते. त्याआधी, आश्विनने घेतलेल्या दोन बळीनंतरही यजमान दक्षिण आफ्रिकेने चहापानापर्यंत २ बाद १८२ धावांची मजल मारली होती. सलामीवीर एडन मार्करामला (९४) गृहमैदानावर खेळताना शतकाने हुलकावणी दिली. आश्विनच्या गोलंदाजीवर तो यष्टिरक्षक पार्थिव पटेलकडे झेल देत माघारी परतला. त्याने १५० चेंडूंना सामोरे जाताना १५ चौकार लगावले.