नवी दिल्ली : पहिल्या कसोटीत गोंधळलेले ऑस्ट्रेलियन फलंदाज दुसऱ्या कसोटीतही गडबडले. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी मिळून ६ बळी तर घेतलेच, मात्र एकट्या मोहम्मद शमीने ४ बळी घेत कांगारूंची दाणादाण उडवली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २६३ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताने पहिल्या दिवसअखेर बिनबाद २१ धावा अशी मजल मारली.
दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार रोहित शर्मा (१३*) आणि लोकेश राहुल (४*) खेळपट्टीवर होते. दिवसातील अखेरच्या चेंडूवर नॅथन लियोनच्या चेंडूवर पंचांनी रोहितला शॉर्टलेगला झेलबाद ठरवले. मात्र, डीआरएस घेतल्यानंतर चेंडू बॅटला स्पर्श करून न गेल्याचे स्पष्ट झाले. त्याआधी, कांगारूंनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकोम्ब यांच्या दमदार अर्धशतकी खेळीचा अपवाद वगळता इतर कांगारू फलंदाज सपशेल अपयशी ठरले. शमी, जडेजा, अश्विन यांनी मिळून ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तसेच, कांगारूंचे शेपूट अधिक वळवळणार नाही, याची खबरदारी शमीने घेत भारताला पकड मिळवून दिली.
राहुलचा अफलातून झेललोकेश राहुलने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या उस्मान ख्वाजाचा पॉइंटवर हवेत सूर मारत जबरदस्त झेल घेत सामन्यावर भारताला पकड मिळवून दिली. रिव्हर्स स्वीपवर बऱ्याच धावा काढून भारताला दडपणात आणलेल्या ख्वाजाने ४६ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर जडेजाला पुन्हा रिव्हर्स स्वीप मारला. मात्र, यावेळी पॉइंटवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या राहुलने हवेत उडालेला चेंडू एका हाताने अचूक झेलला.
चेतेश्वर पुजाराला सलाम!
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना चेतेश्वर पुजाराचा शंभरावा सामना ठरला. पहिल्या दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी सर्व भारतीय खेळाडूंनी पुजाराच्या दोन्ही बाजूला उभे राहून टाळ्या वाजवून त्याचे मैदानात स्वागत केले. आपल्या संघाकडून मिळालेला हा ‘गार्ड ऑफ ऑनर’ पाहून पुजाराही भारावला. पुजाराने गावसकरांच्या हस्ते ‘विशेष कॅप’ स्वीकारली. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनीही उभे राहून टाळ्या वाजवत पुजाराला मानवंदना दिली.
धावफलकऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : डेव्हिड वॉर्नर झे. भरत गो. शमी १५, उस्मान ख्वाजा झे. राहुल गो. जडेजा ८१, मार्नस लाबुशेन पायचीत गो. अश्विन १८, स्टीव्ह स्मिथ झे. भरत गो. अश्विन ०, ट्रॅविस हेड झे. राहुल गो. शमी १२, पीटर हँड्सकोम्ब नाबाद ७२, ॲलेक्स केरी झे. कोहली गो. अश्विन ०, पॅट कमिन्स पायचीत गो. जडेजा ३३, टॉड मर्फी त्रि. गो. जडेजा ०, नॅथन लियोन त्रि. गो. शमी १०, मॅथ्यू कुन्हेमन त्रि. गो. शमी ६. अवांतर - १६. एकूण : ७८.४ षटकांत सर्वबाद २६३ धावा. बाद क्रम : १-५०, २-९१, ३-९१, ४-१०८, ५-१६७, ६-१६८, ७-२२७, ८-२२७, ९-२४६, १०-२६३. गोलंदाजी : मोहम्मद शमी १४.४-४-६०-४; मोहम्मद सिराज १०-२-३०-०; रविचंद्रन अश्विन २१-४-५७-३; रवींद्र जडेजा २१-२-६८-३; अक्षर पटेल १२-२-३४-०. भारत (पहिला डाव) : रोहित शर्मा खेळत आहे १३, लोकेश राहुल खेळत आहे ४. अवांतर - ४. एकूण : ९ षटकांत बिनबाद २१ धावा. गोलंदाजी : पॅट कमिन्स ३-१-७-०; मॅथ्यू कुन्हेमन ४-१-६-०; नॅथन लियोन २-०-४-०.